भंडाऱ्यात जेवायला गेलेल्या माणसाला कुणी मारतं का? मोताळ्यात संतापजनक प्रकार; लोखंडी रॉड अन् लाकडी दांडक्याने बेदम मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा!
“तू जेवायला का आला, तुला कोणी आमंत्रण दिले?” या प्रश्नावरून वाद; भंडाऱ्यातील जेवणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत, शितीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार...
भंडाऱ्यात जेवायला गेला, अन् अचानक वाद पेटला!
या प्रकरणातील तक्रारदार विजय गुलाब ताकतोडे यांच्या फिर्यादीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी ते खेरा येथील दुर्गादेवीच्या भंडाऱ्यात जेवणासाठी गेले होते. त्यावेळी गावातील गौरव संदीप गावंडे याने ‘तू जेवायला का आला, तुला कोणी आमंत्रण दिले?’ असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला.जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे जाब विचारल्याने वाद वाढला. त्यानंतर गौरव संदीप गावंडे याने विजय ताकतोडे यांना खाली पाडून लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
एकाने लोखंडी रॉडने, तर दुसऱ्याने लाकडी दांडक्याने मारले!
वाद सुरू असतानाच संदीप गावंडे यानेही लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे विजय ताकतोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दोघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.
भंडाऱ्यासारख्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात जेवणासाठी गेलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे मारहाण झाल्याच्या वृत्ताने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला कसा गेला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बोऱाखेडी पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी विजय गुलाब ताकतोडे यांच्या फिर्यादीवरून बोऱाखेडी पोलिसांनी २५ ऑक्टोबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शिंगेपट्टू आणि पोलीस कॉन्स्टेबल सदानंद हाडे करीत आहेत.भंडाऱ्यातील जेवणावरून एखाद्याला अपमानित करणे, त्यानंतर मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप समोर येणे, ही गंभीर बाब आहे. आता पोलिस तपासात नेमके काय निष्पन्न होते आणि या प्रकरणातील आरोपांबाबत पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.