

डिजेमुक्त होणार क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्मोत्सव! ८ एप्रिलला मशाल यात्रेने सुरुवात, ११ एप्रिलला बुलडाण्यात भव्य शोभायात्रा; महिला जागर कार्यक्रम अन् आरोग्य शिबिरही होणार...
Updated: Apr 7, 2025, 14:45 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती यंदा डीजे मुक्त होणार आहे. ८ एप्रिल पासून हा जन्मोत्सव सोहळा सुरू होणार असून ११ एप्रिल ला सायंकाळी बुलढाणा शहरात भव्य शोभायात्रा होईल. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीने यंदा विविध कार्यक्रमांचे आयोजन त्या निमित्ताने केले आहे. याबद्दलची माहिती आज, ७ एप्रिलला बुलढाणा येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे यांनी दिली. यावेळी जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते..
पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यातून माती आणि पाणी घेऊन निघालेली मशाल यात्रा ८ एप्रिलला बुलढाण्यात पोहोचेल.
९ एप्रिलला मुठ्ठे लेआउट बुलढाणा येथील महात्मा फुले शाळेत महिला जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी सायंकाळी पुरस्कार वितरण समारंभ देखील पार पडणार आहे. १० एप्रिलला महात्मा फुले शाळा येथे सकाळी दहा ते दुपारी तीन पर्यंत भव्य आरोग्य शिबिर पार पडणार आहे. या आरोग्य शिबिरात नामांकित रुग्णालयात विविध आजारांवर काम करण्याचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. ११ एप्रिलला सायंकाळी ५ संगम चौकातून भव्य शोभा यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लक्ष्मीकांत बगाडे यांनी दिली. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विशाल सुरोशे, सचिव राजेश पवार, कार्याध्यक्ष नीलकंठ यांच्यासह महिला समितीचे अध्यक्ष प्रीती खंडारे, सचिव प्रीती डांगे, दीपक चौधरी, सुरेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते..
.