पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जिल्हा काँग्रेसकडून निषेध; "दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा" राहुल बोंद्रे यांची केंद्र सरकारकडे मागणी

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध काँग्रेस पक्षाने केला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर चिखली शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने आज ,२४ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी "दहशतवाद भारताच्या एकता आणि अखंडतेला सुरूंग लावत असून केंद्र सरकारने आता या दहशतवादाचा कायमचा बिमोड केला पाहिजे," अशी ठाम भूमिका मांडली.

निषेध आंदोलनाची सुरुवात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून करण्यात आली. यानंतर २६ मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिसरात भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, देश के सन्मान में काँग्रेस मैदान में अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.
या आंदोलनाला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, डॉक्टर्स, समाजसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. चिखली शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी यांच्यासह डॉ. मोहमंद इसरार, सचिन बोंद्रे, प्रा. निलेश गावंडे, डॉ. सत्येंद्र भुसारी, रामभाऊ जाधव, आणि इतर प्रमुख कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्ल्याचा तीव्र निषेध करताना केंद्र सरकारने कठोर पावले उचलून देशवासीयांना दहशतवादमुक्त वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.