अवैध गौणखनिज वाहतुकीविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांची धडक मोहीम; 47 विनानंबर टिपर जप्त, 10 लाखांहून अधिक दंड वसूल !
Updated: Nov 18, 2025, 10:23 IST
बुलढाणा:(बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विशेष मोहिम राबविली जात असून या मोहिमेअंतर्गत रविवार, दि. 16 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या नेतृत्वातील पथकाने अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ४७ टिपर वाहनांवर दंडात्मक कारवाई करत १० लाखांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली. तसेच देऊळगांव राजा तालुक्यातील सिंनगाव जहाँगीर व खल्याळ गव्हाण परिसरात जिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकाव्दारे अवैध वाळू उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकून संबधितांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत.
यापूर्वी १४ ॲागस्ट २०२५ रोजी देखील जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी अचानक अनेक ठिकाणी भेट देवून एकाच दिवशी ३० अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या विनानंबर टिपरविरुद्ध 6.50 लाखांची दंडात्मक कारवाई केली होती. याचपद्धतीची 19 मे 2025 रोजी देखील कारवाई त्यांनी केली होती.
नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 897 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून संबधित 110 वाहन चालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाच्या संयुक्त कारवाईव्दारे जिल्ह्यात 1 एप्रिल ते 17 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात 897 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. यापैकी 414 प्रकरणे अवैध उत्खनन, वाहतुक संबंधित आहेत. 483 विना नंबर वाहनांनवर कारवाई केली, तर 110 प्रकरणांत गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व कार्यवाहीमधून जिल्हा प्रशासनाने एकूण 4 कोटी 87 लाख रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे.
अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा महूसल, परिवहन, पोलीस व अन्य विभागाचे तालुकास्तरावर भरारी पथके कार्यरत आहेत. ही पथके गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करत आहेत. रॉयल्टी पासेस किंवा वाहतूक पासेस नसलेल्या वाहनांवर शासन नियमांनुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे. नागरिकांना परिसरात कुठेही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याचे आढळल्यास, त्यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार किंवा पोलीस विभागास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
