घरकुलाच्या बांधकामावरून दोन कुटुंबांत पेटला वाद; ६० वर्षीय वृद्धाच्या गळ्यावर धारदार चाकूने तीन वार, तर ४० वर्षीय महिलेच्या हातावर कुऱ्हाडीचा घाव!
मलकापूर तालुक्यातील देवधाबा गावात थरार; परस्परविरोधी तक्रारींनी खळबळ...
मिळालेल्या माहितीनुसार, देवधाबा येथील किशोर प्रल्हाद सोनाने (वय ६०) आणि त्यांचे शेजारी सुधाकर मधुकर जावरे यांच्यात घरकुलाच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला होता. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी टिनपत्रे काढल्याच्या कारणावरून या वादाला सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. मात्र, किरकोळ कारणावरून सुरू झालेला हा वाद पुढे जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
किशोर सोनाने यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ते शौचास जात असताना आरोपीने त्यांना अडवले. यावेळी रात्री तू वाचला होतास, आता तुला जिवंतच मारतो, अशी धमकी देत त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने तीन वार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर सोनाने रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी कोसळल्याचे तक्रारीत नमूद आहे.विशेष म्हणजे, गळ्यासारख्या नाजूक आणि संवेदनशील भागावर चाकूने वार करण्यात आल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. गंभीर जखमी झालेल्या किशोर सोनाने यांच्यावर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, याच वादातून दुसऱ्या बाजूनेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुधाकर जावरे यांच्या पत्नी मीना जावरे (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किशोर सोनाने आणि कुसुमबाई किशोर सोनाने यांनी संगनमत करून त्यांना व त्यांच्या पतीला शिवीगाळ केली. यावेळी किशोर सोनाने यांनी मीना जावरे यांच्या पतीला घराबाहेर येण्याचे आव्हान दिल्याचा आरोप आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, दोघे घराबाहेर आले असता कुसुमबाई यांनी मीना जावरे यांच्या उजव्या हातावर काठीने मारहाण केली. तसेच किशोर सोनाने यांनी त्यांच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात मीना जावरे यांच्या उजव्या हाताला दुखापत होऊन सूज आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एकाच वादातून दोन गंभीर आरोप; नेमके घडले तरी काय?
घरकुलाच्या बांधकामासारख्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये झालेल्या वादाचे आता गंभीर फौजदारी प्रकरणात रूपांतर झाले आहे. एका बाजूने वृद्धाच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या बाजूने महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेत नेमकी सुरुवात कोणी केली, वादाचे खरे कारण काय होते आणि हल्ल्यावेळी नेमके काय घडले, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.