दिव्यांगांसोबत बेईमानी, म्हणजे ईश्वरासोबत बेईमानी - बच्चू कडू; शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे बुलडाण्यात स्वागत ..!
Sep 1, 2025, 13:39 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : 'दिव्यांगांसोबत बेईमानी, म्हणजे ईश्वरासोबत बेईमानी', हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगत, संघटनेतील कार्यकर्त्यांनाही दिव्यांगांच्या न्याय्य हक्कासाठी तुटून पडा, असे आवाहन माजी मंत्री तथा बच्चू कडू यांनी दिली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. मंत्री बच्चू कडून यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार हक्क यात्रा ३१ ऑगस्ट रोजी बुलढाण्यात पाेहचली हाेती. स्थानिक जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात पार पडलेल्या
दिव्यांग मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ, निलेश वटाने, प्रहार दिव्यांग क्रांतीच्या जयश्री गिते, राजेश पुरी, मुकेश राजपुत, अजित फुंदे, प्रहारचे वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख अजय टप, गजानन लोखंडकार, सुनील वाघ, गणेश काकडे, गणेश जाधव, सोणू वाघ, सुरेश जवंजाळ, नारायण महाले, विष्णु घाडगे, अमोल माळोदे, धिरज सरोदे, सचिन नेमाने, अजय शिंदे, बनकर, राहुल क्षिरसागर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
बच्चू कडू पुढे म्हणाले की, आपण आमदार असतांना एकुन आठ लक्षवेधी लावल्या आणि १८२ शासननिर्णय काढले. तसेच, दिव्यांगांसाठी लढतांना आपल्यावर सुमारे २५० गुन्हे दाखल झाले. संघटनेच्या अधिक मजबूतीसाठी आणि दिव्यांगांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कठोर पावले उचलली जातील. पैशे घेणाऱ्यांची लगेच हकालपट्टी केली जाईल. अपंगांसोबत बेईमानी करणाऱ्याला संघटनेत ठेवणार नाही,' असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
संघटना अधिक प्रभावी करण्यासाठी लवकरच नवीन रचना जाहीर केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला तीन जिल्हाप्रमुख देणार आणि संघटन नव्याने उभे करणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. याशिवाय, दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आणि त्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही बच्चू कडू यांनी दिले.
