"डीआयओ" साहेब तुम्हारा चुक्याच! प्रशासनाची चूक झाकण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाची धडपड!
पत्रकारांना खोटे ठरवण्याचा प्रकार दुर्दैवी! माहिती कार्यालयाने सत्य खुलासा करावा; जिल्हा पत्रकार संघाची मागणी....
May 4, 2025, 09:55 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १ मे रोजी पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. या सोहळ्यात पहेलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही. तिथे उपस्थित असलेल्या सजग पत्रकारांनी वृत्तधर्माचे पालन करून प्रशासनाची ही चूक आपल्या बातम्यांमधून निदर्शनास आणून दिली. मात्र असे असताना जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने खोडसाळपणा केला. शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात पहेलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याची खोटी बातमी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून वर्तमानपत्रांना पाठवण्यात आली. ज्या पत्रकारांनी सत्य बातमी छापली त्या पत्रकारांना खोटे ठरवण्याचा निंदनीय प्रकार जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आल्याने पत्रकारांकडून संताप व्यक्त होत आहे. पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रकार असून जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी तात्काळ खुलासा करावा आणि आपले खोटे शासकीय वृत्त मागे घ्यावे अशी मागणी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी केली आहे...
शासकीय योजना, कार्यक्रम, शासनाची धोरणे बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे असते. मात्र शासनाच्या चुकांवर पांघरून घालण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने केले. पालकमंत्री ना.मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला. पोलिसांचे पथसंंचलन झाले, समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सन्मानही झाला. मात्र या कार्यक्रमात पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली देण्याचा प्रशासकीय यंत्रणेला विसर पडला. अशी गंभीर चूक पुन्हा होऊ नये म्हणून तिथे उपस्थित पत्रकारांनी त्याबद्दल वृत्त छापले. मात्र त्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाने शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे खोटे वृत्त माध्यमांच्या प्रतिनिधींना पाठवले. पालकमंत्री आणि प्रशासनाला वाचवण्यासाठी पत्रकारांना खोटे ठेवण्याचा प्रकार जिल्हा माहिती कार्यालयाने केला. त्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयाने ते वृत्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी रणजीतसिंग राजपूत यांनी केली आहे. शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात जर खरंच श्रद्धांजली वाहण्यात आली असेल तर त्यासंबंधीचे पुरावे फोटो किंवा व्हिडिओ द्यावेत असे खुले आव्हान देखील श्री.राजपूत यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाला दिले आहे.