दिलजमाई..! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड एकाच फ्रेममध्ये; "त्या"वादानंतर दोन्ही नेते एकत्र... शिवसैनिक म्हणतात, तुटेपर्यंत ताणू नका....
Jan 21, 2025, 14:09 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शांत राहून अतिशय अटीतटीच्या लढतीत विजय मिळवल्यानंतर आ.गायकवाड यांचा असंतोष उफाळून आला होता. विजयानंतर आ.गायकवाड यांनी पुन्हा एकदा जुन्या मुडमध्ये जाऊन प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांना लक्ष करीत त्यांनी आपले काम केले नसल्याचे विधान केले होते. एकदा नव्हे तर वारंवार अशाच आशयाची विधाने आ.गायकवाड यांच्याकडून होत होती. त्यामुळे जिल्हा शिवसेनेत प्रतापराव जाधव विरुद्ध संजय गायकवाड असा वाद उभा राहतो की काय असे एकंदरीत चित्र निर्माण झालेले असताना काल परवा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड एकाच कार्यक्रमात एकत्र दिसले..त्यामुळे खरेखुरे पक्षनिष्ठ शिवसैनिक सुखावले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे...
जिल्ह्यातील काही नेत्यांना आपली प्रगती सहन होत नाही असे म्हणत प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे केल्याचा गौप्यस्फोट आ. संजय गायकवाड यांनी नागपूर अधिवेशन काळात केला होता. त्याचवेळी आ.गायकवाड यांनी ना. फुंडकर यांच्याशी देखील जवळीक दिसून आली होती. कुटे यांचे मंत्रीपद कटण्यामागे गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा आमदारांची नाराजी देखील कारणीभूत असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. खरेतर आ. गायकवाड यांनी आपले राजकीय गुरू म्हणून अनेकदा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा उल्लेख याआधी वारंवार केलेला आहे.
मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अट्टाहास आणि त्यानंतरची विधानसभा निवडणूक या काळात दोन नेत्यांमधील संबंध बिनसल्याचे चित्र बाह्य वर्तुळात निर्माण झाले, अर्थात त्यात तथ्य होतेच. मात्र त्याची जाहीर वाच्यता होत नव्हती. अखेर आ.गायकवाड यांनी त्यावर शिक्कामोर्तब करून टाकले. दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मात्र या विषयावर जास्तीचे भाष्य करण्याचे टाळत राजकीय प्रगल्भतेचा परिचय दिला. शिवसेनेत होत असलेली ही धुसफूस मात्र सामान्य शिवसैनिकांना रुचलेली नव्हती. जे होतंय ते चुकीचं अशा भावना अनेक शिवसैनिक खाजगीत व्यक्त करताना दिसत होते. अशातच आता काल परवा मोताळा तालुक्यातील निपाना गावात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय गायकवाड बऱ्याच कालावधीनंतर एकत्र दिसले.दोघांमध्ये संवाद देखील झाला..त्यामुळे तुटेपर्यंत न ताणता झाले गेले विसरुन जाऊन दोन्ही नेते एकत्र येत असतील तर शिवसेना आणि जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ते फायद्याचे आहे अशा भावना शिवसैनिक बोलून दाखवत आहे...