सार्वजनिक बांधकाम विभागाने लाज सोडली? वारंवार तक्रारी करूनही शेळगाव आटोळ– देऊळगाव घुबे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचेच; डॉ.विकास मिसाळ म्हणाले, ठिय्या आंदोलन करतो...

 
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... सार्वजनिक बांधकाम विभागाला लाज वाटत नाही की काय? असा सवाल आता शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, पिंपळवाडी, देऊळगाव घूबे येथील नागरिक करू लागले आहेत. त्याला कारणही तसेच असून शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे दरम्यानच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे..
 
   यासंबंधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ.विकास मिसाळ यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी देखील करण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला अंदाज पत्रकानुसार काम करण्याची निर्देश देण्यात आले होते..मात्र हा प्रकार किंवा दिखाव्यापुरता होता की काय? असा संशय आता येऊ लागला आहे..कारण ठेकेदाराला सूचना देऊन देखील काम थातुरमातुर सुरू आहे, शासकीय निधीचा हा अपव्यय आहे. त्यामुळे तयार होणारा रस्ता देखील निकृष्टच राहील असे म्हणत परिसरातील सरपंचांना घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ.विकास मिसाळ यांनी म्हटले आहे...