श्रीक्षेत्र माकोडीत रामनवमी निमित्त शोभायात्रा, रामनामी रंगले भाविक ! श्रीहरी महाराज म्हणाले,नामस्मरणाने भगवंताच्या प्रेमाची ओढ लागेल
Apr 7, 2025, 08:49 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मायबाप संतांचे मनुष्य जीवनावर मोठे उपकार आहेत. भगवंताच्या नामाची गोडी लावण्याचे काम संत करतात. रामनामाचा महिमा अगाध आहे. रामनामाचा ध्यास घेतल्याने शाश्वत असलेले सुख म्हणजे समाधान प्राप्त होते. भगवंताच्या प्रेमाची ओढ लागण्यासाठी अट्टाहासाने नामस्मरण करा असे मार्गदर्शन समर्थ सद्गुरु श्री. श्रीहरी महाराज यांनी केले.
माकोडी येथे राम नवमी निमित्त चैतन्य मंदिर परिसरात जमलेल्या भाविकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. श्रीक्षेत्र माकोडी आज रामनामी रंगून गेले होते. रामनवमी निमित्त ६ एप्रिल सकाळी काकडा आरती, अभिषेक व विधिवत पुजाअर्चा पार पडल्यानंतर आकर्षक सजविलेल्या रामरथासह श्रीहरी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत गावातून शोभायात्रा काढण्यात आली. भगवे झेंडा धारी सेवक, अश्व, टाळ-मृदगांचा गजर, व राम नामाचा जयघोष करीत भाविकांनी शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी यात्रेत महिला-पुरुष भाविकांनी आनंदोत्सव साजरा करीत फुगड्यांचे फेर धरले.
प्रभूरामचंद्राच्या जयघोषाने माकोडी दुमदुमन गेली होती. शोभायात्रेच्या स्वागतासाठी परिक्रमा मार्गात सडासमार्जन करुन आकर्षक रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुपारी चैतन्य मंदिरात रामजन्माची कथा सांगून रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी श्रीहरी महाराज म्हणाले की, भवसागरात तरुण जाण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे आणि सेवा
कार्यात सहभागी राहणे आवश्यक आहे. ईश्वराचा अवतार हा दृष्टांचा संहार, नाश करण्यासाठी असतो. मात्र संत, सदगुरु हे मार्ग चुकलेल्यांना देखील चांगला मार्ग दाखवितात. भगवंताची मनापासून सेवा केल्याने त्याच्या नामाची गोडी लागते. आणि यातून मग जीवनाचे खरे मर्म समजते. त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडे का होईना रामनामाचा जप करावा, असेही श्रीहरी महाराज म्हणाले.
राम जन्मसोहळ्याच्यानिमित्ताने हभप ज्ञानेश्वर माऊली निरपूकर यांनी किर्तन सेवा दिली. ७ एप्रिल रोजी रोजी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे.