‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेत बदलाची मागणी"! आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत मांडला औचित्याचा मुद्दा! का म्हणतायेत आ.खरात योजनेत बदल करा? वाचा...
Dec 10, 2025, 11:17 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या तातडीच्या प्रश्नावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले. ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेतील अटी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांशी जुळत नसल्याने तात्काळ बदल आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
आमदार खरात यांनी सांगितले की अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी ०.५० ते १ किंवा १.५ एकरांच्या छोट्या गट क्रमांकात येतात. विद्यमान नियमानुसार २ एकरपर्यंत ३ अश्वशक्तीचा पंप देण्यात येतो; परंतु असा पंप खोल विहिरीतून पाणी उचलू शकत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. त्यांनी सुचवले की क्षेत्रफळाची अट शिथिल करून, कमी क्षेत्र असले तरी त्या ठिकाणी किमान ५ किंवा ७.५ अश्वशक्तीचा सौर पंप देण्यात यावा.
डोंगराळ भाग, उंच-नीच भूभाग, सोलार पॅनल लावण्यासाठी जागेचा अभाव किंवा पावसाळ्यात पुराचा धोका अशा ठिकाणी सौर पंपाचा उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अशा शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी विशेष धोरणात्मक तरतूद करावी, अशी मागणीही आमदारांनी केली.
खरात यांनी २०२२ पासून नवीन कृषी वीजजोडणीसाठी अर्ज करून रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांचा मुद्दाही मांडला. पैसे भरूनही अनेकांना अद्याप वीज मिळालेली नाही. शासनाने या शेतकऱ्यांना तात्काळ वीजजोडणी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा
शेतकऱ्यांच्या अडचणी, भौगोलिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष अडथळे लक्षात घेऊन सौर पंप योजनेच्या अटी बदलाव्यात, तसेच नवीन वीजजोडण्या तातडीने द्याव्यात, असा ठाम आवाज विधानसभेत उमटला. या मुद्द्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचल्या असून, लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
