राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : रविकांत तुपकर; क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : राज्य शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संकटे जणू शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी पिचला जात आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत, ही गंभीर अवस्था लक्षात घेऊन शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संथापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे,युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह राज्यस्तरीय शिष्टमंडळाने आज दि. 2 सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यात निर्माण झालेली विदारक परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देत तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. यावेळी चर्चा करताना रविकांत तुपकर यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. चालू खरीप हंगामात अनेक भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना आवश्यक पाणी मिळत नाही. 

परिणामी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, मका यांसह विविध खरीप पिके पाण्याअभावी वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पिकांची वाढ खुंटली असून पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत व इतर शेती खर्चासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके हातातून जाण्याचे आणखी मोठे संकट उभे ठाकले आहे. दोन दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके नष्ट होऊन खरीप हंगाम हातातून जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे शेतकरी पुरते खचले आहेत. शेतकऱ्यांवर मानसिक व आर्थिक ताण निर्माण होत आहे, पिकांची आणि शेतकऱ्यांची ही गंभीर अवस्था पाहता शासनाने तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली.

 क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्य शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यासह पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत द्यावी, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांची पीक कर्जे व शेतीशी संबंधित कर्जांना तातडीने स्थगिती देऊन कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घ्यावा,शेतकऱ्यांना वीज बिलात सवलत देऊन शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा करावा, पिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने सिंचनाचे नियोजन, जलसाठ्यांचा वापर व आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा,दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून वितरित करावी, जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करावी, दुष्काळग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करावीत,शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे, खते व आवश्यक कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, पावसाअभावी शेतकऱ्यांवर निर्माण झालेला आर्थिक व मानसिक ताण लक्षात घेऊन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदत व समुपदेशन यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी पूर्व वेळ वीज उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच जळालेले ट्रांसफार्मर तात्काळ बदलून देण्यात यावे आधी मागण्या या निवेदनात नमूद आहेत. या मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा एखादा देखील यावे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी ‘क्रांतिकारी‘ चे नेते अमोल मोरे, अॅड. प्रवीण सुरडकर, सुनिल मिसाळ, बाळू पाटील, नितीन सोनटक्के, निलेश राजपूत, रामेश्वर अंभोरे, श्रीराम चलवाड, विठ्ठल खेडेकर, हरिभाऊ उबरहांडे, भागवत धोरण, अरबाज खान, हनुमान मिसाळ, लक्ष्मण भगत, संजय काकडे, मंगेश मिसाळ, पवन काकडे, हर्षल गवते, यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.