काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांसाठी लेक गार्गी ची भावनिक पोस्ट! म्हणाली,"बाबा, इतकं काम करता पण त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर कां टाकत नाही?’मग सपकाळ लेकीला काय देतात उत्तर...वाचा...
Feb 15, 2025, 09:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. बुलढाण्याच्या भूमिपुत्राचा हा सन्मान झाल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वपक्षीय राजकीय वर्तुळातून सपकाळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांची लेक गार्गी सपकाळ हिने आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्ट मधून काही आठवणींना उजाळा देत गार्गीने वडीलांना शुभेच्छा दिल्या आहेत.. वाचा गार्गी ने लिहिलेली पोस्ट जशीच्या तशी...
बाबांना शुभेच्छा!
प्रिया बाबा,
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यापासून समाज माध्यमं, वर्तमानपत्रे आणि बातम्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ कोण? या चर्चेला उधाण आलेलं आहे. अनेकांनी तुमच्या जिवन प्रवासाचा आणि कार्याचा अत्यंत सखोलपणे आढावा घेतला आहे. काहींनी नियुक्तीबाबत टीका सुद्धा केल्या. पण एक मुलगी म्हणून या नियुक्तीबाबत मला खूप अभिमान वाटतो.
खरंतर तुमचा प्रवास कधीच सरळ-सुटसुटीत नव्हता. तो संघर्षांनी भरलेला, चढ-उतारांचा आणि धैर्याचाच होता. लोकांच्या मनात नेत्यांबाबत एक ठराविक चित्र तयार झालेलं आहे. ‘माझे बाबा राजकारणात आहेत’ असा विचार करताना किंवा तुमच्याबद्दल इतरांना वर्णन करत असताना, तुम्ही त्या चौकटीत कधी बसलात नाही हेच जाणवलं. महात्मा गांधी, विनोबा आणि तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या जिवन मूल्यांचे आचरण करत साधी राहणी आणि उच्च विचार अशीच तुमच्या जीवनाची वाटचाल राहिलेली आहे.
आता पर्यंतच्या प्रवासात अनेक अवघड प्रसंग आले, पण तुम्ही त्यांना अत्यंत समर्थपणे सामोरे गेलात. या प्रसंगांमध्ये सोपा आणि सोयीस्कर मार्ग नेहमीच निवडता आला असता, पण तुम्ही तुमच्या मूल्यांशी आणि तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. तुमच्या निर्णयांमध्ये तत्त्वनिष्ठा आणि सचोटीचा आदर्श नेहमीच प्रकर्षाने जाणवला.
शेतकरी, उपेक्षित, आणि आदिवासी समाजासाठी तुम्ही नेहमी सक्षमपणे आणि कुठलाही अहमभाव न ठेवता काम करत आहात. काम करताना मी कायमच सांगायचे की, ‘बाबा, इतकं काम करता पण त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर कां टाकत नाही?’ तेव्हा तुम्ही दिलेले उत्तर महत्वाचे वाटते. आपण मनापासून केलेल्या कामाचा कधीही गाजावाजा करायचा नसतो. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपण काम करत राहायचे.
माझ्यात निर्माण झालेल्या सामाजिक जाणिवेचा, आणि त्या जाणिवेला कृतीत उतरवून उपेक्षित समाजासाठी करत असलेल्या माझ्या छोट्या प्रयत्नांमध्ये, तुम्ही बालपणापासून माझ्यात रुजवलेल्या मूल्यांचे खूप मोठे योगदान आहे. काम करताना मी कधीही गोंधळले असेन, तरी तुम्ही मला नेहमी एकच सांगितलं: "तू जे काही करशील, त्याचा फायदा समाजातील शेवटच्या माणसाला व्हायला हवा, आणि हे करताना तुझे पाय जमिनीवर असायला हवेत. उतू नकोस, मातू नकोस. घेतलेला वसा सोडू नकोस." हे तत्त्व माझ्या कृतीत आणि विचारात प्रेरणादायी ठरतं.
बाबा, तुम्ही दाखवलंत की प्रामाणिकपणे काम केल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, जगात कुठेही पोहोचता येतं. तुम्ही माझे हिरो आहात आणि कायम राहाल. आज तुमच्या संघर्षाच्या, सचोटीच्या आणि तत्वनिष्ठेच्या बळावर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याबद्दल बोलतोय. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं! हे पुन्हा एकदा तुम्ही सिद्ध केलंत.
प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तुम्ही समर्थपणे पार पाडाल, यात शंका नाही. काँग्रेस हा एक विचार आहे. पण डॉ. आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे प्रभावी विचार देखील मरू शकतो, जर त्या विचारांना पुढे नेण्यासाठी योग्य वाहक मिळाला नाही तर. तुम्ही एक वाहक आणि कार्यकर्ता म्हणून पुन्हा जनतेच्या मनामनात आणि घराघरात तो विचार पोहोचवाल आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहाल याचा ठाम विश्वास आहे.
खूप खूप शुभेच्छा!
तुमचीच,
गार्गी