वरवंडच्या पाणी प्रश्नावर दत्तात्रय जेऊघाले यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन! जल जीवन मिशन योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; ठेकेदाराने केलीय मोठी भानगड...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वरवंड (ता.जि. बुलढाणा) येथील जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या पाणी पुरवठा योजने काम तातडीने करून वरवंड गावकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी वरवंड येथील हनुमान मंदिरासमोर काल ,६ मार्च पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
      
  वरवंड (ता.जि.बुलढाणा) येथे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कामासाठी शासनाच्या वतीने ४ कोटी ९९ लक्ष ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर कारण्यात आला आहे. या संदर्भात ई-निवेदा झाल्यानंतर सदर योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश श्री. लक्ष्मण देशमूख शासकीय कंत्राटदार (रा. खामगाव) यांना दि. ३१-०१-२०२३ रोजी देण्यात आला आहे. सदर कार्यारंभ आदेशानुसार सदर योजनेचे १ वर्षाच्या आत म्हणजेच ३१-०१-२०२४ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते परंतु आज मार्च २०२५ उजाडले तरी योजने काम ५०% ही पूर्ण झालेले नाही. सदर योजनेच्या अंदाज पत्रकानुसार कोणतेही काम अस्तित्वात नाही. सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन न करता जुन्याच पाईपलाईनचा वापर करण्यात आला आहे. तसेच पाण्याच्या टाकीचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले आहे. कोणत्याही प्रकारची वितरण व्यवस्थेचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. असे असतांना कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून योजनेचे काम अपूर्ण असतांनाही संपूर्ण देयके काढण्याचा घाट घातला जात आहे व वरवंड गावकऱ्यांना हक्काच्या पाणी पुरवठा योजनेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. तरी सदर योजनेचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी व योजनेच्या कमाला विलंब करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व सदर कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी दत्तात्रय जेऊघाले यांनी काल दि. ०६ मार्च पासून वरवंड येथील हनुमान मंदिरासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत योजनेचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत माझे अन्नत्याग आंदोलन सुरुच राहिल व यातून होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहिल, असा इशारा दत्तात्रय जेऊघाले यांनी दिला आहे.