देशासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या सैनिकांसाठी दगडवाडी ग्रामपंचायतने घेतला निर्णय! माजी सैनिकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च उचलणार....

 
देऊळगावराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील दगडवाडी (रघुवीरवाडी) ग्रामपंचायत आधीपासूनच माजी सैनिकांचा आदर करत आली आहे. आता माजी सैनिकाचे निधन झाल्यास त्यांच्या अंतिम संस्काराचा खर्च उचलण्याचा ठरावही ग्रामपंचायतीने घेतला आहे.
 ज्या सैनिकांनी देश संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचले, त्या सैनिकांचा आदर करण्याची शिकवण ग्रामपंचायत देत आहे. शहीद रघुनाथ जायभाये हे २००२ मध्ये मणिपूर येथे कार्यरत असताना शहीद झाले होते. त्यांचे नाव या गावाला देण्यात आले. रघुवीरवाडी असे त्यावेळी ठरले. तो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्याचबरोबर शहिदांचे स्मारक या गावांमध्ये उभे केले असून १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला नियमित या स्मारकाचे पूजन केले जाते. त्याचबरोबर या गावातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या पत्नीला घरकुल देण्यात आले आहे. 
   आता नव्याने ही ग्रामपंचायत माजी सैनिकांचा अंतिम संस्काराचा खर्च उचलणार असल्याचा ठराव सरपंच चंद्रकला गजानन घुगे यांनी पारित केला आहे. त्याचबरोबर माजी सैनिक व शहीद जवानांची पत्नीच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतीमध्ये १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजीचे झेंडावंदन केले जाते. त्याचबरोबर आधी सैनिक व माजी सैनिकांना ग्रामपंचायतीकडून ज्या काही सवलती दिल्या जातील त्या देण्याचा प्रयत्न करू, असे सरपंच चंद्रकला घुगे यांनी सांगितले.