संग्रामपूर तालुक्यातील २४ गावांना चक्रीवादळाचा जबर फटका;१५८६.७० हेक्टरवरील रब्बी पिकांचे मोठे नुकसान; शासनाकडे अहवाल सादर...

 
 संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हवामानातील अचानक बदल आणि चक्रीवादळसदृश परिस्थितीमुळे संग्रामपूर तालुक्यासह परिसरातील २४ गावांना जोरदार फटका बसला असून, १५८६.७० हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिके—मका, हरभरा, गहू तसेच संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबतचा प्राथमिक नुकसान अहवाल कृषी विभागाने ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
मागील वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी, महापूर आणि ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप हंगाम पूर्णतः उध्वस्त झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा रब्बी हंगामावर केंद्रित झाल्या होत्या. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी हंगामालाही फटका बसला आहे.
२८ व २९ जानेवारी २०२६ रोजी संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूरसह २४ गावांत वादळी वारे व अवकाळी पावसाने थैमान घातले. चक्रीवादळसदृश वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली. या घटनेचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने ३० जानेवारीला जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.
या अहवालानुसार, संग्रामपूर तालुक्यातील १५८६.७० हेक्टरवरील मका, हरभरा, गहू व संत्रा बागांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून, आधीच खरीप हंगामातील नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांपुढे आता रब्बीतील हानीमुळे दुहेरी संकट उभे राहिले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना पुन्हा एकदा जोरदार तडाखा बसला आहे.