मशागतीची कामे रखडली; ट्रॅक्टर बांधावर बंद, पंपावाले म्हणे कॅन मध्ये डिझेल देत नाही..जिल्हाधिकारी साहेब मार्ग काढा! शेतकऱ्यांचा टाहो...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा प्रचंड कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी इंधन कमी वापरण्याचे आवाहन केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करण्यावर अनेकांनी भर दिला, त्यामुळे पंपावरील साठा लवकर संपत आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी कॅन मध्ये पेट्रोल आणि डिझेल देऊ नये अशा सूचना दिलेल्या असल्यामुळे पंपचालक पेट्रोल डिझेल देत नाहीत,त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल ट्रॅक्टरला मिळत नसल्यामुळे मशागत खोळंबली आहे.
पेरणी तोंडावर आलेली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. जमिनीची नांगरणी व इतर मशागती साठी यंत्रांचा वापर होत आहे, मात्र यंत्रांसाठी आवश्यक असलेले डिझेल मात्र मिळत नाही, बांधावरच अनेक शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर डिझेल नसल्याने बंद पडले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना असल्याने पंपचालक कॅनमध्ये डिझेल द्यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत,त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर लवकर मार्ग काढावा..शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल देण्यात यावे अशी मागणी होत आहे.