अंचरवाडीत आजपासून रंगणार क्रिकेटचा महाकुंभ..! एपीएलच्या "बुलडाणा लाइव्ह" चषकाचे आ. श्वेताताई महाले आणि ऋषीभाऊ जाधवांच्या हस्ते होणार उद्घाटन! ग्रामीण भागातील खेळाडूंचे टॅलेंट दिसणार...

 
 अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे आज,२७ जानेवारीला अंचरवाडी प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होत आहे. अंचरवाडी प्रीमियर लीगचे हे ७ वे पर्व असून या सोहळ्याचे बहारदार उद्घाटन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्वेताताई महाले पाटील आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सुपुत्र युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषी जाधव यांच्या हस्ते होणार आहे.दुपारी १२ वाजता अंचरवाडी येथील श्री सिद्धिविनायक मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे..

   अंचरवाडी येथील सिद्धिविनायक जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात ३१ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याची सांगता ७ फेब्रुवारीला महाप्रसादाने होणार आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धिविनायक जन्मोत्सवानिमित्त आयपीएलच्या धर्तीवर अंचरवाडी प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ८ संघाचा सहभाग असून आयपीएल प्रमाणे प्रत्येक खेळाडूंचा लिलाव झालेला आहे.चिखली आणि देऊळगावराजा तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले असून या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील खेळाडूंचे टॅलेंट समोर आहे. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांच्या सौजन्याने ३१ हजार रुपये ठेवण्यात आले असून दुसरे पारितोषिक भारतीय जनता पार्टी अंचरवाडी जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने २१ हजार रुपयांचे ठेवण्यात आलेले आहे..याशिवाय खेळाडूंना व्यक्तिगत कामगिरीच्या आधारावर देखील बक्षिसे मिळणार आहेत.या उद्घाटन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अंचरवाडी प्रीमियर लीगच्या आयोजन समितीने केले आहे...