धाडस..साहस! अस्वलाने झडप घातली, १३ वर्षांच्या गायत्रीने झाडावर चढून वाचवला जीव! जखमी अवस्थेतही दाखवले धाडस; भिंगारा शिवारातील थरारक घटना
गायत्री डावर ही आपल्या बहिणीसोबत भिंगारा शिवारातील शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेली होती. दुपारच्या सुमारास अचानक एक अस्वल त्यांच्या दिशेने आले. काही कळण्याच्या आतच अस्वलाने गायत्रीवर हल्ला केला.
अचानक आलेल्या या संकटात अवघ्या १३ वर्षांच्या गायत्रीने दाखवलेले धाडस कौतुकास्पद ठरले आहे. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने धडपड करत जवळच्या झाडाचा आधार घेतला आणि झाडावर चढून स्वतःचा जीव वाचवला. अशा प्रसंगी मोठ्या माणसाचीही भंबेरी उडू शकते; मात्र गायत्रीने प्रसंगावधान राखत स्वतःला वाचवण्यासाठी घेतलेला निर्णय तिच्या धाडसाची आणि जिद्दीची साक्ष देणारा आहे.
बहिणीने गावाकडे धाव घेतली; आई-वडील घटनास्थळी
गायत्रीवर हल्ला झाल्यानंतर तिच्या बहिणीने तातडीने गावाकडे धाव घेतली आणि आई-वडिलांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आई-वडिलांनी शेताकडे धाव घेतली.त्यावेळी गायत्री जखमी अवस्थेत झाडावर चढलेली होती. अस्वलाच्या हल्ल्यात तिच्या शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले.घटनेची माहिती मिळताच सरपंच पती सरदार आवाशे यांच्यासह ग्रामस्थांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमी गायत्रीला तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्राथमिक उपचारानंतर अकोल्याला हलविले
ग्रामीण रुग्णालयात गायत्रीवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र जखमांची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी तिला अकोला येथील शासकीय रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गायत्रीला अकोला येथे रवाना करण्यात आले.
गायत्रीच्या धाडसाला सलाम!
या घटनेत गायत्री जखमी झाली असली तरी जीव वाचवण्यासाठी तिने दाखवलेले धैर्य निश्चितच उल्लेखनीय आहे. अस्वलासारखा वन्यप्राणी अचानक समोर आलेला असताना घाबरून न जाता झाडावर चढून स्वतःचा बचाव करण्याचा तिचा प्रयत्न तिच्या धडाडीचे दर्शन घडवतो.
१३ वर्षांच्या या चिमुकलीने संकटाच्या क्षणी दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावे, असेच या घटनेतून दिसून येते.
भिंगारा परिसरात भीतीचे वातावरण
दरम्यान, सरदार आवाशे यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी गायत्रीची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.भिंगारा परिसरात अस्वलाचा वावर असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, शेतमजूर, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.अस्वलाचा तातडीने शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करावा आणि परिसरात वन विभागाची गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.