पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचारी मुंबईत धडकणार; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही – रमाकांत गायकवाड

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील सुमारे पाच महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळीही अंधारात गेली असून शासनाच्या निष्क्रियतेविरोधात ४ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ४ ते ६ फेब्रुवारीदरम्यान जिल्हास्तरावर आंदोलन करण्यात आले असून ९ फेब्रुवारीपासून राज्यातील सुमारे ५०० कंत्राटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर धडक देऊन बेमुदत आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, छत्रपती संभाजीनगर यांनी दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याचा निर्णय दिला असतानाही त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच प्रलंबित मानधन तात्काळ जमा करणे, मार्चपर्यंत व पुढील आर्थिक वर्षातील मानधनाची तरतूद लेखी स्वरूपात जाहीर करणे आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करणे या प्रमुख मागण्यांवर शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजना असतानाही त्यामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा व नियमित मानधन दिले जात नसल्याबद्दल गायकवाड यांनी खंत व्यक्त केली. जिल्हास्तरावर २० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित असताना बाह्य स्त्रोत यंत्रणेमार्फत भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन नियमित कसे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित राहण्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच संभाव्य आर्थिक अनियमिततेची चौकशी करावी, अशी मागणीही कृती समितीने केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही रमाकांत गायकवाड यांनी दिला.