सततची नपिकी, कर्जबाजारीपणा..घरातले सगळे झोपल्यावर शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला; चिखली तालुक्यातील मंगरूळ येथील घटना
Sep 30, 2024, 08:53 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील मंगरूळ येथे ही घटना घडली. रामदास आनंदा गवते(५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
रामदास गवते यांच्याकडे तीन एकर शेती...शेतीवर जिल्हा बँकेचे व विविध खासगी पतसंस्थांचे कर्ज..कर्ज वसुलीसाठी बँकेवाले तगादा लावायचे..शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत रामदास गवते होते..👇
यंदा होणाऱ्या सोयाबीन कपाशीतून सगळे कर्ज फेडून टाकू असे त्यांनी ठरवले होते. मात्र सोयाबीनवर हुमनी अळी आणि कपाशीवर कीड रोगाने मोठे नुकसान झाले. हाती उत्पादन आलेही तरी त्याला भाव मिळेल की नाही याची गॅरंटी नाही, त्यामुळे त्यांनी जगाचा निरोप घ्यायचा टोकाचा निर्णय घेतला.👇
घरातील सगळे झोपल्याचे पाहून रामदास गवते यांनी गच्चीच्या टॉवरच्या सिमेंटच्या कॉलमला पांढऱ्या दोरीने गळफास घेतला. सकाळी मुले झोपेतून उठली, बाबा दिसत नाहीत म्हणून त्यांनी गच्चीवर जाऊन पाहिले असता टॉवरला मुलांनी गळफास घेतल्याचे दिसले. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला..घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.