शेगावातील आरोग्य मेळाव्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झाडल्या आरोपांच्या फैरी! म्हणाले,४ कोटींचे हेलिपॅड दोन दिवसांत उखडून टाकू...
सपकाळ यांच्या आरोपानुसार, शेगाव येथे आयोजित या मेळाव्यासाठी तब्बल १० ते १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. उद्घाटनासाठी द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी उभारण्यात आलेल्या हेलिपॅडवरच सुमारे ४ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
विशेष म्हणजे, श्री संत गजानन महाराज संस्थान यांनी हेलिकॉप्टर उतरण्यासाठीची जागा दोन दिवसांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. तरीही त्या ठिकाणी तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप आहे. राष्ट्रपतींचा दौरा संपल्यानंतर हे हेलिपॅड उखडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
‘कायमस्वरूपी सुविधा का नाही?’
सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जर हे हेलिपॅड शासकीय जागेवर कायमस्वरूपी उभारले असते, तर शेगावसारख्या संत नगरीला दीर्घकालीन सुविधा मिळाली असती. मात्र केवळ दोन दिवसांच्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करणे म्हणजे शासकीय पैशांचा चुराडाच आहे.”
कंत्राट प्रक्रियेवरही त्यांनी शंका उपस्थित करत संबंधित कंत्राट केंद्रीय मंत्र्यांच्या निकटवर्तीयाला देण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र या आरोपांबाबत अधिकृत स्तरावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
स्टॉल कमी, प्रतिसादही मर्यादित?
मेळाव्यात ७० स्टॉलचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र २० ते २५ स्टॉलच उभारण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असेही सपकाळ यांनी नमूद केले.
राजकीय वातावरण तापले
या आरोपांमुळे बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, केंद्र सरकार आणि आयुष मंत्रालयाकडून अधिकृत खुलाशाची मागणी होत आहे. मेळाव्याच्या खर्चाबाबत पारदर्शकता ठेवावी आणि खर्चाचा सविस्तर हिशोब जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, या आरोपांवर आयुष मंत्रालय अथवा संबंधित यंत्रणेकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.