बुलढाण्यात काँग्रेसकडून निवडणूक आयोगाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा! मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध मुद्द्यांवर लेखी आक्षेप नोंदवल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातील जिल्हा काँग्रेस भवनासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या आंदोलनातून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
पोलिसांची कारवाई; आंदोलकांना घेतले ताब्यात
दरम्यान, प्रतिकात्मक अंत्ययात्रा घेऊन निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घडामोडींमुळे जिल्हा काँग्रेस भवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.