२४ मे पूर्वी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करा! नोंदणी न केल्यास सातबारावर पीक पेरा कोरा राहणार; शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन....
८ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या सातबारा उताऱ्यावर पीक पेरा अँड्रॉईड मोबाईलद्वारे नोंदविणे आवश्यक आहे. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ८९४.३७ हेक्टर क्षेत्राची नोंदणी करण्यात आली असून, एकूण ७ लाख ९९ हजार १९५ पीक पाहणी करावयाच्या मालक प्लॉटपैकी ३७ हजार ४५ प्लॉटवर शेतकऱ्यांनी DCS व्हर्जन ४.०.६ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून पीक नोंदणी केली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई-पीक पाहणी अॅपद्वारे नोंदणी पूर्ण करावी. यासाठी अँड्रॉईड मोबाईल आवश्यक असून गुगल क्रोम अपडेट करून ई-पीक पाहणी व्हर्जन ४.०.६ अॅप इन्स्टॉल करणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेत बांधावर जाऊन पीकांची माहिती अॅपमध्ये भरून अपलोड करावी, असेही सांगण्यात आले आहे.
मोबाईल उपलब्ध नसल्यास किंवा अॅप हाताळण्यात अडचणी येत असल्यास संबंधित गावचे तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर तसेच नियुक्त सहाय्यकांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत १०० टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक असून उभे पीक, कायम पड किंवा चालू पड जमिनींची नोंद करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ई-पीक पाहणी नोंदणी न केल्यास सातबारावर पीक पेरा कोरा राहणार असून त्यानंतर नोंद करता येणार नाही. त्यामुळे पीक विमा, शासकीय अनुदान तसेच नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अवेळी पाऊस किंवा अन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर ७/१२ उताऱ्यावर अचूक पीक नोंद असणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने सर्व शेतकऱ्यांनी २४ मे २०२६ पूर्वी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.