कलेक्टर साहेब सामान्य माणसांच जगणं मान्य करा हो! इसरूळ चे सरपंच सतीश भुतेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना आर्त साद!
रेतीमाफियांच्या टिप्परने पाडला इलेक्ट्रिक पोल; अख्खे गाव अंधारात! खरात कुटुंब थोडक्यात बचावले...
May 22, 2025, 10:36 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा प्रकल्पातून रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक सुरूच आहे. रेती वाहतूक करणारे टिप्परवाले अक्षरशा: सुसाट सुटतात..या टिप्परवाल्यांमुळे मुलगी ते इसरूळ या रस्त्याची चाळणी झाली आहे..अधुनमधून महसूल विभाग कारवाईचा आव आणत असले तरी त्या कारवाया फक्त प्रेस नोट पुरत्या असतात. दरम्यान आता इसरूळ गावात टिप्परवाल्यांचा एक नवा कारनामा समोर आलाय. भरधाव टिप्परने एका इलेक्ट्रिक खांबाला धडक दिली. त्यामुळे खांब पूर्णपणे कोसळला. या प्रकारामुळे इसरूळ चा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित असल्याने गावकऱ्यांवर अंधारात रात्र काढण्याची वेळ आली आहे... इसरूळ चे सरपंच सतीश भुतेकर यांनी या प्रकरणावरून जिल्हाधिकाऱ्यांना खडे सवाल केले आहेत. कलेक्टर साहेब आमचं जगणं मान्य करा..रेतीवाल्यांना आवरा अशी आर्त साद सरपंच सतीश भुतेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घातली आहे..
रेतीवाल्यांना रेती वाहतूक करून पैसा कमवायचा आहे आणि तुमच्या महसूलवाल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील अवैध रेती वाहतुकीच्या माध्यमातून पैसाच कमवायचा आहे असा गंभीर आरोप देखील सरपंच सतीश भुतेकर यांनी केला आहे. अवैध रेती वाहतूक बंद करा, आमच जगणं मान्य करा..नाहीतर गावकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करू असा इशाराही सरपंच भुतेकर यांनी दिला आहे.
राजेंद्र खरात यांचे कुटुंब थोडक्यात बचावले...
दरम्यान इसरूळ मध्ये जो इलेक्ट्रिक पोल टिप्परच्या धडकेने कोसळला तो राजेंद्र खरात यांच्या अगदी घरासमोरच कोसळला. त्यातून विद्युत प्रवाह सुरू होता, सुदैवाने घटनेच्या वेळी कुटुंबीय घरात होते. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती...