आजपासून बारावीची परीक्षा; जिल्ह्यात ११७ केंद्र ३५ हजार २११ विद्यार्थी ; भरारी व बैठे पथकांचा वॉच, पोलिसांचा चोख बंदोबस्त

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेळापत्रकानुसार जिल्ह्यात मंगळवार, १० फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. इंग्रजीचा पहिला पेपर होणार असून जिल्ह्यातील ११७ परीक्षा केंद्रांवर एकूण ३५ हजार २११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

जिल्ह्यात १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा पारदर्शक, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे.
परीक्षा सुरू होण्यापूर्वी दोन तासांपासून ते परीक्षा संपेपर्यंत केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स, कॉम्प्युटर व मोबाईल दुरुस्ती केंद्रे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आठ भरारी पथके तैनात
परीक्षेच्या काळात एकूण आठ भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे दक्षता पथक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पथक, पोलिस अधीक्षकांचे पथक, प्राचार्य तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचा समावेश आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर महसूल विभागाचे ‘बैठे पथक’ तैनात राहणार असून ते पेपर सुरू होण्याच्या एक तास आधी उपस्थित राहील.
सीसीटीव्ही देखरेख व पोलिस बंदोबस्त
गोपनीयता आणि शिस्त अबाधित राहण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रे व १६ परिरक्षक केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरण देऊन परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन दक्षता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.