उद्यापासून १२ वीची परीक्षा! जिल्ह्यात ११६ केंद्रांवर ३४ हजार ६३५ विद्यार्थी देणार परीक्षा; कॉपीमुक्तीसाठी प्रशासन अलर्ट...आठ भरारी पथक कोणत्याही क्षणी टाकतील धाड...!
Feb 10, 2025, 20:25 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उद्या, ११ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन सूचना प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. वर्ग १२ विसाठी जिल्ह्यातल्या ११६ परीक्षा केंद्रांवर ३४ हजार ३६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत..
परीक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरातील कम्प्युटर सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्याआधी दोन तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवावे लागणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध असून चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याची खातरजमा यंत्रणेला करावी लागणार आहे. परीक्षा केंद्रावर पेपर पोहोचवण्यासाठी केंद्रप्रमुखाला चार चाकी वाहनाचा वापर करणे अनिवार्य आहे. शिवाय परीक्षा केंद्रावर पेपर देण्याची वेळ या बाबींचे देखील चित्रीकरण करावे लागणार आहे.
आठ भरारी पथकांची नजर..
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी आठ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके कोणत्याही क्षणी संशयास्पद परीक्षा केंद्रावर धाड टाकू शकतात. याशिवाय प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. या बैठ्या पथकात महसूल विभागाचे कर्मचारी राहणार आहेत.