नागरिकांनो जरा जपून वापरा पाणी! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन; जिल्ह्यातील धरणात उरलाय 152.78 दलघमी पाणीसाठा! पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा!

जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु.... 

 
बुलडाणा, (:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये आज रोजी 152.786 दलघमी (32.65 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या असून त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 17 गावांमध्ये 19 खाजगी टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा आणि पेनटाकळी या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये 71.662 दलघमी(32.18 टक्के) तर ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पामध्ये 53.680 दलघमी (37.89 टक्के) व 41 लघु प्रकल्पामध्ये 27.444 दलघमी (26.49 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे.  

 

जलाशय पातळी अहवालानुसार मोठ्या प्रकल्पांतर्गत नळगंगा प्रकल्पामध्ये 35.32 दलघमी(51 टक्के), खडकपूर्णा प्रकल्पामध्ये 8.32 दलघमी (9 टक्के), पेनटाकळी प्रकल्पामध्ये 28.02 दलघमी(47 टक्के) या तीन मोठ्या प्रकल्पामध्ये एकूण 71.662 दलघमी (32.18 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे.

 

तर मध्यम प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा प्रकल्पामध्ये 22.05 दलघमी(65 टक्के), मस प्रकल्पामध्ये 5.24 दलघमी (35 टक्के), कोराडी प्रकल्पामध्ये 3.69 दलघमी (24.40 टक्के), पलढग प्रकल्पामध्ये 1.24 दलघमी (17 टक्के), मन प्रकल्पामध्ये 14.36 दलघमी (39 टक्के), तोरणा प्रकल्पामध्ये 0.75 दलघमी (10 टक्के), उतावळी प्रकल्पामध्ये 6.35 दलघमी (32 टक्के) असे एकूण सात मध्यम प्रकल्पामध्ये 53.68 दलघमी (37.89 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. तसेच एकूण 41 लघु प्रकल्पामध्ये 27.444 दलघमी (26.49 टक्के) पाणी साठा उपलब्ध आहे. 

 

पाच तालुक्यात 19 टँकरने पाणी पुरवठा

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 17 गावांसाठी 19 टँकर पाणी पुरवठ्याकरिता मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील 6, बुलढाणा येथे 5, चिखली येथे 3, सिंदखेड राजा येथे 1 अशा 15 गावांसाठी प्रत्येकी एक टँकर तर देऊळगावा राजा येथील 2 गावांसाठी 4 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

टँकरने होणारा पाणीपुरवठा याप्रमाणे:

मेहकर तालुक्यातील पारडी, जवळा, हिवरा साबळे, वरवंड, बोथा व पाथर्डी या गावांसाठी प्रत्येकी एक टँकर. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई, सैलानी, ढासाळवाडी, पिंपरखेड व चौथा गावांसाठी प्रत्येकी एक टँकर, चिखली तालुक्यातील कोलारा,श्रीकृष्णनगर व भालगाव येथे प्रत्येकी एक टँकर, सिंदखेड राजा तालुक्यातील सारगाव माळ येथे एक टँकर. तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे तीन टँकर तर निमखेड येथे एक टँकरव्दारे दररोज पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना सुरु - जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

"उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता नागरिकांना पुरेशा पाणी पुरवठ्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. तीव्र पाणीटंचाई भागांमध्ये खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था केली जात आहे. ग्रामीण भागातील १०८ गावात ११८ विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा देखील केला जात आहे. पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी जपून पाणी वापरावे आणि त्याचा अपव्यय टाळावा. प्रशासन आपल्या स्तरावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहे," असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.