चिखलाचे सुपुत्र एकनाथ वाघ यांची उच्च शिक्षणात भरारी; अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी झाली निवड, वसंतराव नाईक विद्यालयाने केला गाैरव !

 
बीबी(श्रीकृष्ण पंधे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामीण भागात राहूनही कठाेर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर लोणार तालुक्यातील चिखला गावचे सुपुत्र  एकनाथ भगवान वाघ यांनी उच्च शिक्षणात भरारी घेतली आहे. त्यांची अमेरिकेच्या अतिशय प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. या ऐतिहासिक यशानिमित्त त्यांचा सत्कार समारंभ बिबी येथील वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पार पडला.

रामकृष्ण शिक्षण प्रसारक संस्था (हनवतखेड) बिबी यांच्या वतीने या सत्कार कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.   संस्थेचे सचिव अभय जगारावजी चव्हाण व संचालिका मायाताई अभय चव्हाण यांच्या हस्ते एकनाथ यांचा शाल, श्रीफळ, हार व रोख रक्कम २१ हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

या प्रसंगी बोलताना सचिव अभय चव्हाण म्हणाले,“आज आपल्या भागातील मुलाने थेट हार्वर्डसारख्या जागतिक दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळवून इतिहास रचला आहे. ग्रामीण भागातील मुले मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कुठेही पोहोचू शकतात, याचे हे मोठे उदाहरण आहे. एकनाथ वाघ यशस्वी झाले म्हणजे केवळ चिखलाच नव्हे तर संपूर्ण लोणार तालुका, बुलढाणा जिल्हा, महाराष्ट्र आणि देश यांचा अभिमान आहे.”

ते पुढे म्हणाले, “आपले शिक्षणसंस्थापक व माजी आमदार कै. जगारावजी चव्हाण यांनी शिक्षण प्रसारासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी १ लाख ११ हजार रुपयांची विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या उपक्रमाचा पहिला मानकरी एकनाथ वाघ असून या शिष्यवृत्तीमुळे दरवर्षी ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल.”
अभय दादा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, “मोठी स्वप्नं पाहण्यास घाबरू नका. तुमच्यातील प्रत्येकात असीम क्षमता आहे. परिश्रम, शिस्त आणि वेळेचा योग्य उपयोग केल्यास तुम्हीही जागतिक स्तरावर यश मिळवू शकता.”


सत्कारानंतर एकनाथ वाघ यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाचा भावनिक उलगडा करताना सांगितले, “मी एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलो. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. पण शिक्षणाची आवड आणि शिक्षकांचा आधार यामुळे मी कधीच हार मानली नाही. गावातून जिल्हा, जिल्ह्यातून राज्य आणि आता थेट अमेरिकेपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडचणी आल्या, पण प्रत्येक संकटाने मला अधिक मजबूत केले.” 
ते पुढे म्हणाले, “आज मी इथे उभा आहे, ते माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे, शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे. विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की, साधनं कमी असली तरी स्वप्नं मोठी असली पाहिजेत. मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर जग जिंकता येतं. माझं स्वप्न आहे की परदेशात शिक्षण घेऊन मी पुन्हा आपल्या मातीत परत येऊन इथल्या विद्यार्थ्यांसाठी काम करावं.”


एकनाथ वाघ यांच्या या अनुभवकथनाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला. विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषणातून मोठी प्रेरणा मिळाली.
ह.भ.प. केशव महाराज बुधवत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर संस्कारांचे महत्त्व असल्याचे सांगितले. 
या कार्यक्रमाला दीपक गुलमोहर, एकनाथ बुरुकुल, बबनराव बनकर (माजी सरपंच), संदीप बनकर, संजय तिडके (माजी सरपंच), नरेंद्र नागरे (माजी सरपंच), जाकीरभाई, विष्णु जोरावर, पवन बनकर, छत्रगुण राठोड, प्राचार्य आर.बी. राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा पंधे, पत्रकार रमेश खंडागळे, पत्रकार ब्रह्मानंद वाकोडे, अनेक पत्रकार बांधव, शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी एकनाथ वाघ यांचे वडील भगवानराव वाघ यांचाही विशेष सत्कार करून कुटुंबाच्या कष्टांनाही दाद देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांनी एकनाथ वाघ यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा सत्कार समारंभ केवळ गौरवच नव्हे, तर ग्रामीण भागातील तरुणाईसाठी नवी दिशा दाखवणारा ठरला.आभार प्रदर्शन खंदारे यांनी केले.