नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिखली अग्निशामक दलाच्या ताफ्यात नवे वाहन! आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपरिषद अग्निशामक दलाच्या ताफ्यात एक नवे व अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज वाहन दाखल झाले आहे . त्याचे लोकार्पण आज चिखली नगरपरिषद प्रांगणात आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार सौ. श्वेता महाले पाटील म्हणाल्या की,
"अग्निशामक दल हे केवळ आगीवर नियंत्रण ठेवणारे पथक नसून प्रत्येक प्रकारच्या आपत्तीमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रथम धाव घेणारे सैनिक आहेत. रस्ते अपघात, पूरस्थिती, आगीच्या घटना अथवा इतर कुठलीही आपत्कालीन वेळ असो – अग्निशामक दलाचे जवान अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या या अथक सेवेला योग्य सुविधा, साधने व सुसज्ज वाहने मिळणे हीच खरी कृतज्ञता आहे. आज या नव्या वाहनामुळे चिखली तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेची ताकद अधिक बळकट झाली आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासन व शासनाकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. चिखलीसारख्या वाढत्या शहरासाठी ही नवीन सुविधा काळाची गरज होती आणि त्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. हे वाहन चिखलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरेल."
या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. प्रशांत बिडगर, ठाणेदार श्री. संग्राम पाटील, ज्येष्ठ नेते श्री. सुरेशअप्पा खबूतरे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष सौ. विमलताई देव्हडे, भाजप शहराध्यक्ष श्री. सागर पुरोहित, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री. शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.