दुर्गम गावांसाठी ‘सीईओ संग्राम’! बुलढाण्याचा प्रयोग पाहून पालकमंत्री म्हणाले, “राज्यासाठी दिशादर्शक”; ११० ग्रामपंचायतींचा गौरव,

 ‘मिशन झेड’मधून गोरगरीब विद्यार्थ्यांना NEET-JEEची मोफत तयारी! सीईओ गुलाबराव खरातांची "खास आयडिया" ठरतेय चर्चेची...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील विकासाच्या स्पर्धेत मागे राहणाऱ्या दुर्गम, आदिवासीबहुल आणि डोंगराळ भागातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘सीईओ संग्राम अभियान (संवेदनशील ग्राम)’ या अभिनव उपक्रमाची राज्यभर चर्चा होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या या उपक्रमाचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी तोंडभरून कौतुक करत तो राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार काढले.

गर्दे वाचनालय येथे आयोजित विशेष गौरव सोहळ्यात ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा प्रत्येकी ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी तब्बल ५६ लाख १० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. याच कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन ZED’ अंतर्गत मोफत NEET-JEE-CET मार्गदर्शन वर्गाचेही मान्यवरांनी कौतुक केले.या सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे, आमदार सिद्धार्थ खरात, नगराध्यक्षा पूजा गायकवाड, ॲड. नाझर काझी, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुर्गम गावांना स्पर्धेच्या मैदानात आणण्याची ‘खरात आयडिया’!

राज्यस्तरीय ग्रामविकासाच्या विविध स्पर्धांमध्ये भौगोलिक परिस्थिती, अपुऱ्या सुविधा आणि मर्यादित साधनसामग्रीमुळे दुर्गम गावांना इतर विकसित गावांशी थेट स्पर्धा करणे अनेकदा अवघड जाते. हीच अडचण लक्षात घेऊन सीईओ गुलाबराव खरात यांनी दुर्गम ग्रामपंचायतींसाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्याची कल्पना मांडली आणि त्यातून ‘सीईओ संग्राम अभियान’ आकाराला आले.

या अभियानात जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. श्रमदान, लोकसहभाग, स्वच्छता, विकासकामे आणि उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी वापर अशा विविध निकषांवर गावांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यातून ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली.पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याच बाबीचे विशेष कौतुक केले.“राज्यस्तरीय स्पर्धेत थेट टिकू न शकणाऱ्या दुर्गम गावांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राबविलेला हा स्वतंत्र उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, ‘सीईओ संग्राम अभियान’ राज्यासाठी दिशादर्शक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.गावांच्या विकासासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता श्रमदान आणि लोकसहभागातून कोट्यवधी रुपयांची कामे उभी राहणे, ही या अभियानाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे.

‘शेंदुर्जन’ ठरले अव्वल! ११० गावांना ५१ हजारांचे बक्षीस

अभियानात सर्वाधिक गुण मिळवून सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन ग्रामपंचायतीने अव्वल क्रमांक पटकावला. या ग्रामपंचायतीचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.एकूण ११० उत्कृष्ट ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना केवळ प्रशासकीय मान्यता नव्हे, तर गावकऱ्यांच्या सहभागाला प्रतिष्ठा आणि प्रोत्साहन देणारे मॉडेल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

प्रतापराव जाधव म्हणाले, ‘मनरेगा + लोकसहभाग अन् गावांचा शाश्वत विकास’

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामविकासासाठी मनरेगा आणि लोकसहभागाची प्रभावी सांगड घालण्याचे आवाहन केले.तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मनरेगाअंतर्गत उपलब्ध निधीचा योग्य वापर करून ग्रामपंचायत भवन, अंगणवाडी, शाळांच्या खोल्या आणि महिला बचत गटांसाठी सुसज्ज सभागृहे उभारण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा निधी गावापर्यंत पोहोचतो; मात्र त्याचा योग्य उपयोग करून त्याला लोकसहभागाची जोड दिल्यास गावांचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळे इतर गावांनीही अशा विकासाच्या अभियानांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जाधव यांनी केले.

गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन ZED’; NEET-JEEचे स्वप्न आता गावातच!

ग्रामविकासासोबतच शिक्षण क्षेत्रातही जिल्हा परिषदेने अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET परीक्षांचे मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत १०० विद्यार्थी या वर्गांचा लाभ घेत आहेत. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना महागड्या खासगी कोचिंगपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

“ग्रामीण भागातील गरीब आणि होतकरू विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमधून उज्ज्वल यश मिळवून आपले भविष्य घडवतील,” असा विश्वास पालकमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

‘गाव बदलले तर जिल्हा बदलेल’; बुलढाणा मॉडेलची राज्यात चर्चा होणार?

एकीकडे दुर्गम गावांना विकासाच्या स्पर्धेत आणण्यासाठी ‘सीईओ संग्राम’, तर दुसरीकडे गोरगरीब विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षेची संधी देण्यासाठी ‘मिशन ZED’—या दोन्ही उपक्रमांतून जिल्हा परिषदेच्या कामाचा वेगळा दृष्टिकोन समोर आला आहे.विशेष म्हणजे, या उपक्रमांना केवळ प्रशासकीय कार्यक्रमाचे स्वरूप न देता लोकसहभाग, स्पर्धा, प्रोत्साहन आणि गुणवत्तेला केंद्रस्थानी ठेवण्याची कल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी पुढे नेली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा परिषदेचा हा प्रयोग भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय ठरण्याची शक्यता आहे.

“भविष्यात बुलढाणा जिल्हा परिषद राज्यातील सर्व उपक्रमांमध्ये प्रथम क्रमांकावर राहील,” अशी अपेक्षाही यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहन, प्रकल्प संचालक पांडुरंग कोल्हे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकळे, आशिष पवार, प्रकाश राठोड, समाजकल्याण अधिकारी प्रमोद एंडोले, कार्यकारी अभियंता सुशील गुडदे, स्नेहल माने आणि शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.