सीईओ खरात यांच्या मनमानीचा भडका : संतप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचा खर्च हक्क सोडून निषेध; १२ कर्मचारी व २ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे बेकायदेशीर निलंबन..!
Sep 11, 2025, 20:35 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराचा ज्वालामुखी अखेर फुटला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या तपासणीत त्यांनी कायद्याला धाब्यावर बसवून तब्बल १२ आरोग्य कर्मचारी व २ वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित केले. विशेष म्हणजे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा अधिकारच नसताना त्यांनी केलेल्या या बेकायदेशीर कारवाईने संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने तत्काळ स्थगिती देऊन या कारवाईला चपराक लगावली.
सीईओंच्या हुकूमशाही पद्धतीचा निषेध म्हणून संतप्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अखेर आपले खर्च मंजुरीचे अधिकार (डी.डी.ओ.) एकमुखाने सोडून धडक पाऊल उचलले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून अधिकार परत केले.
या निर्णयामुळे आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रशासकीय विस्कळीतपणा निर्माण होणार हे निश्चित झाले आहे. पगारवाटप, खर्च मंजुरी, आर्थिक व्यवहार यांसारखी सर्व जबाबदारी थेट सीईओंवर कोसळणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकताच सीईओ खरात यांची खोटी कारभारशैली उघडी पडली आहे.
“आम्हाला बळीचा बकरा बनवले जाते” – संतप्त अधिकाऱ्यांचा इशारा
अत्यल्प मनुष्यबळ आणि अपुऱ्या निधीतूनही आरोग्य संस्था सुरळीत चालवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मात्र, बांधकामातील त्रुटी, दुरुस्तीतील ढिसाळपणा किंवा प्रतिनियुक्त सफाई कामगारांच्या हलगर्जीपणासाठी आम्हालाच जबाबदार धरण्यात येते. अलीकडच्या निलंबनामुळे विभागात भीती आणि असंतोषाचे वातावरण आहे, असा ठपका अधिकारी संघटनेच्या गट-अ बुलढाणा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या निवेदनात ठेवला.