BREAKING निर्णय द्यायची "कॅट"ला घाई नाही! बुलडाणा एसपींच्या विषयावर पुन्हा नवी तारीख! होम–हवन महापूजेचा फायदा होईल का?
Jul 4, 2025, 19:26 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सध्या आयपीएस निलेश तांबे यांनी कारभार सुरू केला आहे. गेल्या महिन्याभरापासून बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदावरून निर्माण झालेला पेच अद्यापही अंतिम निर्णया–अभावी प्रलंबित आहे. २२ मे रोजी तत्कालीन एसपी विश्व पानसरे यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते बदलीच्या निर्णयाविरोधात कॅटमध्ये गेले होते. २३ मे रोजी विश्व पानसरे यांना तात्पुरता दिलासा मिळाला, कॅटने बदली आदेशाला स्थगिती दिली. मात्र त्याआधी २२ मे च्या रात्री निलेश तांबे यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता..
तेव्हापासून या विषयावर कॅट मध्ये तीनदा सुनावणी झाली..आज ,४ जुलैला यावर अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल अशी अपेक्षा असताना तसे काही झाली नाही..न्यायालयाने पुन्हा एकदा नवी तारीख दिली आहे..आता बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा फैसला २१ जुलैलाच होऊ शकतो..सध्यातरी परिस्थिती "जैस–थे" आहे.. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय निलेश तांबे यांच्या अधिकार क्षेत्रात तर जिल्हा पोलीस अधीक्षकांचा शासकीय बंगला विश्व पानसरे यांच्या ताब्यात आहे...
आतापर्यंत काय घडलं?
२२ मे रोजी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची बदली झाली होती. त्यांच्या ऐवजी निलेश तांबे यांना बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्याच दिवशी तांबे यांनी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभारही स्वीकारला होता. दुसरीकडे वैद्यकीय रजेवर गेलेल्या पानसरे यांनी बदलीच्या आदेशाला थेट कॅटमध्ये आव्हान दिले. कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच नऊ महिन्यांच्या आतच बदली होत असल्याने अन्याय झाल्याची भावना पानसरे यांची होती. २३ मे रोजी कॅट मध्ये सुनावणी होऊन पानसरे यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती..मात्र दुसरीकडे निलेश तांबे हेच बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार सांभाळत होते..
३० में रोजी सकाळी साडेसात वाजताच विश्व पानसरे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या खुर्चीचा ताबा घेतला होतो. "रजेवर होतो हजर झालो" एवढेच त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यामुळे ३० मे रोजी एकाच पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन पोलीस अधीक्षक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दुपारी आयजी रामनाथ पोकळे यांनी येऊन मध्यस्थी केल्यानंतर तणाव निवळला होता.. या प्रकारानंतर कॅटमध्ये या विषयावर तीन सुनावण्या झाल्या. मात्र अंतिम निर्णय लागला नाही..आज ४ जुलै रोजी यावर अंतिम निर्णय येईल अशी चर्चा होती, मात्र आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे..
होम हवन..महापूजा..भानगड काय?
दरम्यान सध्या जिल्हा पोलीस दलात "एसपी" या विषयावर वेगळवेगळ्या चर्चा सुरू आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यावर तर चक्क होम हवन आणि महापूजा झाल्याची खात्रीलायक माहिती असल्याची तुफान चर्चा आहे. कॅट चा निकाल आपल्या बाजूने लागावा यासाठी ही पूजा झाल्याचे गुपचूप बोलले जात आहे..ही पूजा देखील अत्यंत गुपचूप झाल्याची चर्चा आहे..अर्थात खरेच ती पूजा निकाल बाजूने लागावा यासाठी झाली की ती त्यांच्या व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्याची बाब व आस्थेचा विषय आहे हे स्पष्ट नाही..खरेच तशी पूजा झाली असेल तर ती पूजा सात्विक होती की अघोरी हा वेगळा चर्चचा विषय आहे..आता याचा तपास कोण करणार?