"बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल ,करावा विठ्ठल जीवभाव"! बुलडाणा अर्बनचा "गोवर्धन" विठ्ठल भक्तीत तल्लीन!

मोगरा फुलला चे दुसरे पुष्प गुंफताना गणेश शिंदे म्हणाले,सात्विक सुख हे केवळ संतांच्या वाट्याला आले....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "मुख दर्शन व्हावे आता" म्हणत माऊली.. माऊलीचा चाललेला गजर.. "हेचि दान देगा, देवा तुझा विसर न व्हावा"..अशी आळवणी करत बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल.. जीवभाव ..अशा ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या मनोवस्थेपर्यंत मंत्रमुग्ध झालेले श्रोते लाभलेला बुलडाणा अर्बनचा "गोवर्धन" सभागृह देखील रविवारी सायंकाळी विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन गेलेला पाहायला मिळाला. नुसतं ज्ञानोबा माऊली जरी म्हटलं तरी अंतर्मनामध्ये वात्सल्याचा पाझर फुटतो. "देवाचिया द्वारी उभा क्षण भरी.. तेणे मुक्ती चारी" या भावामध्ये परमार्थ माऊलींनी सोपा करून सांगितला. त्यासाठी अंतकरण शुद्ध असाव लागत. ज्ञानोबांच्या सांगण्यानुसार सुख हे आत्म्याशी निगडित आहे. भौतिक सुख, ब्रह्म आणि सात्विक सुख; यात सात्विक सुख हे केवळ संतांच्याच वाट्याला आल्याचे गणेश शिंदे यांनी आपल्या निरूपणात सांगितले. 
बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित "मोगरा फुलला"या निरूपणात रविवारी ( दिनांक १५ सप्टेंबर) सायंकाळी दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. सुरुवातीला बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यासपीठावर ज्ञानेश्वरी ग्रंथाला माल्ल्याअर्पण केले. सौ.सन्मिता शिंदे यांनी "गजानना श्री गणराया आदी वंदू तुज मोरया" गीत सादर करत मोरया मोरयाच्या गजरात कार्यक्रमाला सुरुवात केली.
यावेळी ज्ञानोबा उलगडून सांगत असताना गणेश शिंदे म्हणाले की, भगवंत हातात शस्त्र घेऊन जन्माला आले. "एक गुरु -एक शिष्य" परंपरा ही ज्ञानोबा माऊलींनी मोडून काढत ज्ञानाचे दालन खुले केले. ज्ञानाला भाषेची मर्यादा होती. ती देखील दूर केली. ते शास्त्र घेऊन जन्माला आले. केवळ अंतकरण शुद्ध असले तर भगवंतच तुमच्याकडे येईल. यासाठी परमार्थ त्यांनी सोपा करून सांगितला आहे. एका बाजूला साधन वापरण्यासाठी असतात आणि माणस जपण्यासाठी. मात्र आपण माणसं वापरतो अन् साधन जपतो. साधनांनी आयुष्य सोप होईल पण सुख मिळेल हे सांगता येत नाही. मोह , माया, मत्सर दूर गेल्याशिवाय आपण सुखाने जगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला अंतर्मनामध्ये डोकावून पाहावं लागेल. 
माऊलींनी सुख हे आत्म्याशी निगडित असल्याचे सांगितल्याचा आवर्जून उल्लेख केला. मनाची स्थिरता येण्यासाठी संत साहित्यामध्ये आपल्याला डोकावून पहावं लागेल. संतांनी भगवंत भेटीची ओढ जपली. पण त्यांच्याकडे काय मागितलं हे देखील महत्त्वाच आहे. तुकोबांनी हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा असं म्हटलं तर संत संग घडो सदा हे दान मागितलं. ज्ञानोबा माऊलींनी तर "जो जे वांछील तो ते लाहो"च पसायदान मागितल आहे. हे सांगत असताना प्रभूरामचंद्र यांचा नदी पार करतानाचा केवट सोबत घडलेल्या प्रसंग देखील त्यांनी वानगीदाखल सांगितला. अहंकाराने माणसं दुरावतात, अहंकाराने माणूसपण लोप पावते. त्यासाठी "अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, अहंकार आला वाया गेला" तसेच जो मीपणा विसरला , तो सन्यासी या माऊलींच्या ओवीचा अर्थही समजावून सांगितला. माणसं आयुष्यात निघून गेली की त्यांची किंमत कळायला लागते. जो पर्यंत ती आहेत तोपर्यंत जपा. माणूस तुलना करण्यातच जगतो, हीच सगळ्यात मोठी चूक आहे. कुणाच्याही मागे निंदा नालस्ती करू नका. त्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा देवाच्या नामस्मरणामध्ये वेळ घालवा. एक वेळ सीसीटीव्ही कॅमेरा मधून तुम्ही सुटाल पण देवाच्या नजरेतून मात्र कुणीच सुटला नाही. त्याचा हिशोब हा होतोच. आज माणसाने जे वर्तनिय आहे ते वाचनीय केल. आणि जे वाचनीय आहे ते वर्तनीय केल्याची चिंता देखील व्यक्त केली. 
 माऊलींनी प्रेमाची भाषा सांगितली आहे.जो पर्यंत भक्त आहे. तो पर्यंत देवाचं देवपण आहे. जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. नात्यांमधला ओलावा संपत चालला आहे. त्यामुळे मिळालेली नातीगोती जपा, असे सांगताना श्रीकृष्ण परमात्मा एका करंगळीवर पर्वत उचलू शकतो. पण बासरी मात्र तो दोन्ही हातांनी घट्ट पकडतो. रणांगण वेगळ आणि प्रेम वेगळं.ते घट्ट पकडून ठेवावे लागतं , असंही शिंदे निरूपणात म्हणाले.  
राम -कृष्ण हेच खरे नायक !
खर तर नायक आपल्याला इतरत्र शोधण्याची गरजच नाही. रामायण ,महाभारतात ते आहेत. राम , कृष्ण हे खरे नायक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संतसज्जन हे खरे नायक आहेत. आपल्या लेकरांना ते सांगण्याची जबाबदारी आपली आहे. संत विचारांची समृद्धता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी ही सामूहिक स्वरूपाचे असल्याचेही शिंदे यांनी उल्लेखित केले.
पहिल्या पुष्पामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा विवाह झाल्याचा प्रसंग सांगितला. आज विठ्ठल पंतांचे संसार सोडून काशीला जाणे. श्रीपाद स्वामींची भेट. तेथे संन्यस्त जीवन जगणे. पुढे श्रीपाद स्वामींचे यात्रेनिमित्त आळंदीला येणे आणि तिथे रुक्मिणीला दिलेला आशीर्वाद आणि काशीला चैतन्य म्हणून त्या आश्रमात राहत असलेल्या विठ्ठल पंतांना गुरु आदेश म्हणून संसारामध्ये परतावा लागणे. समाजाकडून विठ्ठलपंत व रुक्मिणी यांची सुरू झालेली अवहेलना. त्यांच्या संसार वेलीवर निवृत्तीनाथ आणि नंतर ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म इथपर्यंत निरूपण केले. 
यावेळी बुलडाणा अर्बन चे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उपाख्य भाईजी, सीएमडी डॉक्टर सुकेश झंवर , अनंताभाऊ देशपांडे, डॉ.संजय पाटील, राजेश देशलहरा , ऍड जितेंद्र कोठारी यांचेसह बुलडाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष महेश चेकेटकर , सचिव प्रशांत काळवाघे व कार्यकारणी सदस्य तसेच मुख्यालयातील कर्मचारी व पदाधिकारी तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक व ईतर गणमान्य उपस्थित होते... 
टाळ, चिपळ्या अन् बासरीचे आल्हादायक सूर..
"मोगरा फुलला"च्या निमित्ताने सलग दोन दिवस "गोवर्धन" सभागृह भक्तिमय होऊन गेले आहे. ज्ञानोबा माऊली, तुकाराम महाराज यांच्या लावलेल्या प्रतिमा, मुख्य मंचाची झेंडू फुलांनी केलेली सजावट, ओमकराच्या रुपात सजलेले व्यासपीठ, समईतील पेटलेली ज्योत, टाळ- मृदुंग, तबला -पेटी, चिपळ्यासह बासरीतून निघणारे अल्हाददायक सूर आणि समोर दर्दीची गर्दी ओसंडून वाहत आहे. सौ सन्मिता धापटे-शिंदे यांनी "कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतलावर"... "धाव धरी आई , आता पाहतेस काही"...
 "आता कुठे धावे मन, तुझे चरण देखेलिया..." 
भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद"..
 "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" , सोबतच नाथ महाराजांचे भारुड "सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला... याची प्रसंगांनुरूप गायन सेवा दिली.