थाळ्या वाजवून आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिल्या शासनाविराेधात घाेषणा; १६ दिवसांपासून कामबंद आंदोलन; शासनाच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष..!
Sep 5, 2025, 11:17 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :दहा वर्षे सेवा पूर्ण करूनही शासकीय सेवेत कायम न केल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. १९ ऑगस्टपासून सुरू असलेले बेमुदत कामबंद आंदोलन आज १६ व्या दिवशी ‘थाळी बजाओ’ आंदोलनात परिवर्तित झाले. शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी थेट थाळ्या वाजवून आपला रोष व्यक्त केला.
जिल्ह्यातील तब्बल ७५० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जिजामाता प्रेक्षागृहावर सुरु असलेल्या उपोषण स्थळी महिलांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “निर्णय होऊनही शासन अंमलबजावणी करत नाही. आम्ही आरोग्य व्यवस्थेची कणा असूनही आम्हाला दुर्लक्षित केले जात आहे,” अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
सीटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संघरत्न साळवे, मनीषा बोराडे, मेघा पारस्कर, दत्तात्रय गायकवाड, गौरव वानखेडे, स्वाती गावंडे आदी उपस्थित होते.
राज्य समन्वयक संगीता सरदार, पूनम वाशिमकर, मंगेश गावंडे, डॉ. दत्ता गायकवाड, जिल्हा समन्वयक नितीन इंगळे, हरिदास अंभोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी थाळ्या वाजवून शासनाचे लक्ष वेधले.आंदोलनस्थळी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारले.