बुलडाण्याच्या गुलमोहर अपार्टमेंटमध्ये चोरट्यांचा डल्ला..! दीड लाखांचा मुद्देमाल लांबवला...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील गुलमोहर अपार्टमेंटमधील घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली.
सनि संजय पांढरे यांनी यासंदर्भात शहर पोलिसांत तक्रार दिली. सनि पांढरे मुळ केळवद येथील रहिवासी असून मुलीच्या शिक्षणानिमित्त ते बुलडाण्यात राहतात. मंगळवारी पांढरे हे सहकुटुंब शेगांव येथे दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी उशिरा घरी पोहचले असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. बेडरूममध्ये जावून बघितले तर घरातील साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसून आले. कपाटाचे दार सुद्धा उघडे होते. त्यामधून एक लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याचे निदर्शनास आले. एवढेच नाही तर चांदीचे इतर दागिने चोरी झाल्याचे आढळून आले. असे एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुळवे करीत आहेत.