फटाके फोडणाऱ्या बुलेट पोलिसांच्या रडारवर; तीन दिवसात ३८ बुलेट चालकांवर कारवाई; पोलिसांकडून विशेष मोहिम !
Dec 20, 2025, 16:58 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात फटाके फोडणाऱ्या बुलेटवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसात ३८ बुलेट चालकावर धडक कारवाई केली. पोलिसांकडून अशा बुलेटवर धडक कारवाई सुरूच राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शहरी भागात बुलेट दुचाकीधारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या कर्कश आवाजामुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर जिल्हा वाहतूक शाखेकडून दि. १७ डिसेंबर २०२५ पासून बुलढाणा शहरात विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेदरम्यान बुलढाणा शहरात वाहन तपासणीची नियमित विशेष मोहीम राबविली जात असून, ज्या दुचाकीधारकांनी (विशेषतः बुलेट चालकांनी) कंपनीने दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या आवाजाचे कर्कश व नियमबाह्य सायलेन्सर बसविले आहेत, अशा वाहनांचा शोध घेऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
अवघ्या तीन दिवसांच्या मोहिमेत ३८ बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांचे नियमबाह्य सायलेन्सर काढण्यात आले आहेत. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे जिल्हा वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बुलढाणा शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी, विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. मोठ्या कर्कश आवाजाचे, नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेत, असे आवाहन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
