बुलेट कॅमेरे, स्वच्छता दूत आणि नव्या कचरा गाड्या; बुलढाण्याच्या कचरा समस्येवर आ. गायकवाडांचा अॅक्शन प्लॅन

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील वाढत्या कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बुलढाणा शहरातील कचरा व्यवस्थापन तसेच मोताळा नगरपंचायतीअंतर्गत पुन्हई शिवारातील कचरा डेपोच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या दालनात आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार संजय गायकवाड, नगराध्यक्षा पूजा गायकवाड तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुन्हई शिवारात सुरू असलेल्या कचरा डेपोमुळे स्थानिक ग्रामस्थ, स्मशानभूमी, व्यायामशाळा तसेच रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बैठकीत सदर कचरा डेपोची जागा हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन जागा तातडीने ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात तसेच रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याने प्रशासनाने त्यावरही कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत कचरा संकलनाची सुविधा पोहोचवण्यासाठी नवीन घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक‘बुलेट कॅमेरे’ बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांच्या नंबर प्लेट तसेच कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी ‘स्वच्छता दूत’ तैनात करण्यात येणार असून, नागरिकांना कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जाणार आहे.

सुरुवातीला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांची बैठक घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येईल. त्यानंतरही रस्त्यावर कचरा टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणे एका महिन्याच्या आत हटविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून लवकरच धडक कारवाई केली जाणार आहे.