बुलडाण्याचा शिवजयंती उत्सव होतोय लोकोत्सव..!सर्वच बुलढाणेकर शिवप्रेमी बनलेत शिवजयंती सोहळा समितीचे कार्याध्यक्ष !पदांबाबतीतही "सार्वजनिक" निर्णय..
Jan 28, 2025, 09:44 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):कोणताही सार्वजनिक उत्सव असो, यात पदांवरून प्रचंड रस्सीखेच व राजी-नाराजी होते. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती, बुलढाणा शहरात ९ वर्षापासून सुरू झाली. २०२५साठी अध्यक्ष व सचिव निवडल्याही गेले, उर्वरित कार्यकारणी निवडण्यासाठी दोन वेळा बैठकही बोलवण्यात आली. परंतु त्यात अनेक जण इच्छुक होते केवळ कार्याध्यक्ष या पदासाठी. त्यामुळे कोणाकोणाला कार्याध्यक्ष करायचे ? हा पेच नवनियुक्त अध्यक्ष सचिवांपुढे होता. अखेर बुलढाणा शहरातील सर्वच शिवप्रेमी जर सोहळ्यात "कार्य" करतात, तर सर्वांनाच "कार्याध्यक्ष" पदाचा सन्मान देण्याचा मोठा निर्णय अध्यक्ष राजेंद्र काळे व सचिव उमेश शर्मा यांनी जाहीर केला.. या निर्णयामुळे बुलढाणा शहरातील सर्वच शिवरायांचे मावळे आता जयंती उत्सव समितीत कार्याध्यक्ष म्हणून "कार्यरत" असतील!
बुलढाणा शहरातील शिवजयंती ही महाराष्ट्रासाठी दिशादर्शक व पथदर्शक ठरली आहे. त्यामुळे समितीतील पदांनाही खूप मोठे महत्त्व आहे. २०२४ शिवजयंती सोहळ्यासाठी जेव्हा आमदार संजय गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झाली होती, तेव्हा त्यांनी सार्वजनिक जयंती समितीचे हे अध्यक्षपद आपल्यासाठी आमदार या पदापेक्षा मोठे असल्याचे म्हटले होते. त्यावरूनच या समितीत कोणतेही पद मिळवण्यासाठी शहरातील प्रत्येक शिवप्रेमी इच्छुक असतो. शहरातील सर्वच शिवप्रेमी कार्याध्यक्ष बदल्यामुळे, आता या शिवजयंती सोहळ्याला खऱ्याअर्थाने व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्यावतीने आतापर्यंत शिवजयंती सोहळ्यात काढण्यात आली काढण्यात आलेली पत्रिका ही केवळ नावांमुळे ६ पानांची होत होती. जवळपास ५०० ते ६०० पदाधिकाऱ्यांची नावे यात असायची, इतकी नावे येऊनसुद्धा ज्यांची नावे या पत्रिकेत नसायची ते नाराज व्हायचे.. अन् ज्यांची नावे असायची त्यातील ७५ टक्के लोक प्रत्यक्ष सोहळ्यात उपस्थित नसायचे. पत्रिकेवर होणारा प्रचंड खर्च, अन् ती छापताना व छापून झाल्यावरही होणारी डोकेदुखी.. हातर वेगळाच विषय असायचा. त्यामुळे २०२५ शिवजयंती सोहळ्यासाठी छापून येणाऱ्या निमंत्रण पत्रिकेत केवळ प्रमुख पाहुणे व होणारे कार्यक्रम वगळून काहीही जास्त न छापण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा समितीच्या या क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे...