दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्याचा शांत पण ठाम आवाज; विद्यार्थी, पालकांसह शेकडो नागरिकांचा मूक मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर..!

 केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी....

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात शुक्रवारी संवेदनशील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पक्षीय भेद बाजूला ठेवत शेकडो नागरिकांनी शांततापूर्ण मूक मोर्चात सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांप्रती ऐक्य व्यक्त केले. कुठेही घोषणाबाजी नाही, गोंधळ नाही; केवळ हातातील निषेधाचे फलक आणि चेहऱ्यावरील संताप... अशा वातावरणात हा मोर्चा पार पडला. हुतात्मा स्मारक येथून मोर्चाला सुरुवात झाली. जयस्तंभ चौक, बाजार गल्ली आणि कारंजा चौक मार्गे मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चादरम्यान शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलनकर्त्यांनी पूर्णपणे शांततेचा मार्ग स्वीकारल्याने संपूर्ण मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

मोर्चात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी काळे कपडे परिधान केले होते, तर काहींनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थी आणि नागरिक शांतपणे चालत होते. घोषणाबाजी किंवा आक्रमक भूमिका न घेता लोकशाही मार्गाने निषेध नोंदविण्याचा संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर पाच सदस्यीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन महामहिम राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी, तसेच केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.या आंदोलनासाठी "संवेदनशील बुलढाणेकरांनी पक्षभेद विसरून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे," असे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र मोर्चात दिसून आले. विद्यार्थी, पालक, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत शिक्षण, न्याय आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी बुलढाण्याचा आवाज शांतपणे पण ठामपणे प्रशासनापर्यंत पोहोचवला.