छत्रपती शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानाचा बुलढाणा शिवजयंती समितीकडून निषेध! राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा गुन्हा दाखल करण्याची मागणी !

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोळी, राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात.. छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येऊन, मा. मुख्यमंत्री यांच्यासाठी मा. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोलापूरकर यांच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणाचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्यासह समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी गुरुवार ६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मनाची अस्मिता असून, त्यांच्या आग्रा सुटकेबद्दल अतिशय चुकीचे विधान विकृत पद्धतीने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. या विधानामुळे तमाम मराठी शिवप्रेमींच्या भावनांना हादरा बसला आहे. विशेष म्हणजे एका यूट्यूब चैनलला ही मुलाखत घेणाऱ्या रीमा अमरापूरकर या सोलापूरकर यांच्या विधानावर ज्या पद्धतीने हसून आश्चर्य व्यक्त करत होत्या, ती पद्धतही अतिशय विकृत वाटली.. त्यांच्यावरही कारवाई करून सोलापूरकर यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.. त्यासाठी बुलढाणा शहरातील तमाम शिवप्रेमींतर्फे हे विनम्र निवेदन देत असल्याचे यात नमूद करण्यात आले. 
तसेच महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांबद्दल चुकीची विधाने करण्याची विकृती अलीकडे वाढत असून, त्याला पायबंद घालण्यासाठी एखादा कठोर कायदा करण्यात यावा, अशी विनंती मा. मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समिती बुलढाणा यांच्यावतीने यावेळी निवेदनातून करण्यात आली.
सदर निवेदन देताना अध्यक्ष राजेंद्र काळे, सचिव उमेश शर्मा, माजी अध्यक्ष ॲड. जयसिंगराजे देशमुख, कोषाध्यक्ष अरविंद होंडे, सांस्कृतिक अध्यक्ष शैलेश खेडकर, गोपालसिंग राजपूत, मोहन पऱ्हाड, संजय बी. गायकवाड, पवन भालेराव, पप्पू देशलहरा, आशिष चौबे, दिगंबर अंभोरे, आकाश दळवी, डी.एस. चव्हाण आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.