बुलढाणा दुष्काळाच्या यादीत; अफवांवर विश्वास ठेवू नका! आ. संजय गायकवाड यांचे शेतकऱ्यांना आवाहन; ५ ऑक्टोबरपासून नुकसानीचे सर्वेक्षण
एका वृत्तपत्रात बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून वगळण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली. याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार गायकवाड यांनी ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. शासनाकडून दुष्काळाच्या अनुषंगाने विचाराधीन असलेल्या २० जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, संबंधित जिल्ह्यांमध्ये येत्या ५ ऑक्टोबरपासून सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असल्याचे आमदार गायकवाड यांनी सांगितले. या सर्वेक्षणादरम्यान प्रत्यक्ष शेतातील पीक परिस्थिती आणि झालेल्या नुकसानीचे आकलन केले जाणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत चुकीच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळाच्या अनुषंगाने विचाराधीन जिल्ह्यांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य दखल घेऊन त्यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.पावसाच्या दीर्घ खंडामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे आता शासनाच्या सर्वेक्षणाकडे लक्ष लागले आहे. प्रत्यक्ष नुकसानीचे पंचनामे आणि शासनाच्या निकषांनुसार मदतीची प्रक्रिया कितपत वेगाने होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष राहणार आहे.