बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका! नागरिकांनी आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे : पालकमंत्री मकरंद पाटील यांचे आवाहन..
May 21, 2026, 19:06 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या अफवा पसरल्याने अनेक पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही नागरिकांकडून अनावश्यक इंधन साठा करण्याचाही प्रयत्न होत असल्याने प्रशासनाने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासन हे विविध ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांच्या सातत्याने संपर्कात असून इंधन वितरण सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, आज (दि. 21 मे) विविध ऑईल कंपन्यांकडून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा करण्यात आला. यामध्ये बीपीसीएलकडून 1 लाख 2 हजार 500 लिटर पेट्रोल व 3 लाख 5 हजार 500 लिटर डिझेल, एचपीसीएलकडून 1 लाख 5 हजार लिटर पेट्रोल व 3 लाख 74 हजार लिटर डिझेल, तर आयओसीएलकडून 6 लाख 80 हजार लिटर पेट्रोल आणि 7 लाख 25 हजार लिटर डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 8 लाख 87 हजार 500 लिटर पेट्रोल आणि 14 लाख 4 हजार 500 लिटर डिझेल उपलब्ध असून दररोज नव्याने इंधनसाठा प्राप्त होत असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले.
गॅस सिलेंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे नियमित 4 लाख 63 हजार 494 ग्राहक असून उज्वला योजनेंतर्गत 2 लाख 5 हजार 715 ग्राहकांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे 7 हजार 950 गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून 16 हजार 448 सिलेंडरचा राखीव साठा उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास पालकमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.