दहावी निकालात राज्यात चमकलामातृतीर्थ बुलडाणा जिल्हा! ९३.९५ टक्के निकालासह विभागात अव्वल...
May 9, 2026, 16:33 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्याने यंदा उल्लेखनीय यश संपादन करत विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल तब्बल ९३.९५ टक्के लागला असून शिक्षण क्षेत्रात बुलढाण्याने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे.
दिनांक २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल काल ,८ मे रोजी जाहीर करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विभागात अव्वल स्थान पटकावले. तर वाशीम जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.०४ टक्के नोंदविण्यात आला.
तालुकानिहाय निकालात सिंदखेड राजा तालुक्याने ९७.६७ टक्के निकालासह प्रथम क्रमांक मिळविला. बुलढाणा तालुका ९६.७१ टक्क्यांसह दुसऱ्या, तर देऊळगाव राजा तालुका ९६.६१ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. दुसरीकडे नांदुरा तालुक्याचा निकाल ८९.३६ टक्के लागून तो सर्वात कमी राहिला.
जिल्ह्यात परीक्षेसाठी एकूण ४० हजार ०३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३९ हजार ६७८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले. यामधून ३७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचा निकाल ९२.३४ टक्के लागला, तर मुलींनी पुन्हा एकदा सरस कामगिरी करत ९५.९६ टक्के निकाल नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसार, नोंदणीकृत विद्यार्थ्यांमध्ये २२ हजार १६२ मुले व १७ हजार ८७६ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्ष परीक्षेस २१ हजार ९६७ मुले व १७ हजार ७११ मुली असे एकूण ३९ हजार ६७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यापैकी २० हजार २८५ मुले आणि १६ हजार ९९६ मुली असे एकूण ३७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांचा निकाल ९२.३४ टक्के तर मुलींचा निकाल ९५.९६ टक्के नोंदविण्यात आला.
तालुकानिहाय निकाल पुढीलप्रमाणे आहे :
सिंदखेड राजा – ९७.६७%, बुलढाणा – ९६.७१%, देऊळगाव राजा – ९६.६१%, चिखली – ९६.२२%, लोणार – ९५.८०%, मेहकर – ९४.५६%, मलकापूर – ९२.५३%, खामगाव – ९२.४२%, मोताळा – ९१.८२%, शेगाव – ९१.५९%, संग्रामपूर – ९०.५५%, जळगाव जामोद – ९०.४८% आणि नांदुरा – ८९.३६%.
जिल्ह्याच्या या घवघवीत यशाबद्दल शिक्षण विभाग, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटला आहे.