देवदर्शनासाठी निघालेल्या बुलढाण्याच्या बसला उत्तर प्रदेशात अपघात; बुलढाणा-अकोल्यातील दोन महिलांचा मृत्यू, ३८ जखमी! केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव बनले देवदूत;

 मदतीसाठी युपी सरकारशी केला संपर्क..जिल्हाधिकाऱ्यांना दिले निर्देश..
 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : काशी विश्वनाथ दर्शनासाठी नेपाळकडे निघालेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशातील गाझीपुर जिल्ह्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून, ३८ भाविक जखमी झाले आहेत. जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

जय श्रीराम टुर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे आयोजित देवदर्शन यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील भाविक अयोध्या व इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. गुरुवारी (दि. ९) सकाळी सुमारे ११.३० वाजता वाराणसी–गोरखपूर महामार्गावर गाझीपुरजवळील नंदगज येथे बसचा अपघात झाला.
या अपघातात अकोला येथील अन्नपूर्णाबाई (वय ५०) तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा मृत्यू झाला. इतर ३८ भाविक जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे, तर उर्वरित जखमींना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी तात्काळ उत्तर प्रदेश राज्य प्रशासनाशी संपर्क साधून जखमींना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी गाझीपुरचे जिल्हाधिकारी दिनेश कुमार तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पांडे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून उपचाराची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.दरम्यान, केंद्रीय मंत्र्यांचे सहाय्यक खाजगी सचिव डॉ. गोपाल डिके व आचल भाटिया हे घटनास्थळी मदतीसाठी रवाना झाले असून, दिल्लीतील मंत्रालयातूनही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक समन्वय सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे संबंधित कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.