भाऊ हे बरं नाही ! राहुल बोंद्रेंच्या संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या "सखी निवासा"त नियम कोलले!तपासणीत गंभीर बाबी आल्या समोर! नोकरी करणाऱ्या महिलांच्या वस्तीगृहात चालतंय काय?

 महिला व बालविकास आयुक्तालयाने ओढले कडक ताशेरे...नेमकं मॅटर काय? जाणून घ्या...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीचे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या एका संस्थेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या महिला वस्तीगृह व्यवस्थापनाचा अंदाधुंद कारभार समोर आला आहे. महिला व बालविकास आयुक्तालयाच्या पथकाने केलेल्या वस्तीगृहाच्या तपासणीत भयंकर त्रुटी आढळून आल्या आहेत. "अहिल्यादेवी होळकर नोकरी करणाऱ्या महिलांचे वस्तीगृह" या नावाने असलेल्या या वस्तीगृहात नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा प्रशिक्षणार्थीच अधिक आढळून आल्या आहेत. शिवाय ज्या महिला या वस्तीगृहात आहेत त्या संबंधित संस्थेतच शिक्षिका असल्याचेही समोर आले आहे. यामुळे संस्थेच्या व्यवस्थापनावर महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास आयुक्तालयाने कडक ताशेरे ओढले आहेत..

 नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकार पुरस्कृत वस्तीगृह योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांच्या निवासासाठी सुरक्षित असे वस्तीगृह उपलब्ध करून देण्यात येते. महिलांना या वस्तीगृहात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता वेळोवेळी महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत या वस्तीगृहांची तपासणी होते. चिखलीत राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेद्वारा "अहिल्यादेवी होळकर नोकरी करणाऱ्या महिलांचे वस्तीगृह" अनुराधा नगर साकेगाव रोड येथे चालवण्यात येते. काही दिवसांमध्ये महिला व बालविकास आयुक्तालयाच्या पथकाने या वस्तीगृहाची तपासणी केली असता व्यवस्थापनात अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. या वस्तीगृहात नोकरी करणाऱ्या महिलांना प्रवेश देण्यासाठी आवश्यक असलेले निकष डावलण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासणीत उघड झाला आहे.
याशिवाय आयुक्तालयाने मागितलेली माहिती संस्थेने उपलब्ध करून दिलेली नाही. व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आलेली नाही. नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा प्रशिक्षणार्थीच या वस्तीगृहात अधिक संख्येने असल्याचेही तपासणी अहवालात म्हटले आहे. याशिवाय ज्या नोकरी करणाऱ्या महिला वस्तीगृहात राहतात त्या राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या संस्थेतीलच शिक्षिका असल्याचेही तपासणीत समोर आले आहे. या वस्तीगृहाचे कामकाज मार्गदर्शक सूचनानुसार होत नाही. आवश्यक निकषानुसार कोणतीही कागदपत्र ठेवलेली नाहीत असेही तपासणीत समोर आले आहे..
कारवाई होणार...?
महिला व बालविकास आयुक्तालयाने संबंधित संस्थेला कारवाईचा इशारा दिला आहे. आवश्यक तरतुदींची पूर्तता न केल्यास संस्थेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असेही महिला व बालविकास आयुक्तालयाच्या सहआयुक्तांनी संस्थेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे...