BREAKING उबाठा शिवसेनेचा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न! शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह हेक्टरी ५० हजार मदतीसाठी केले आंदोलन....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री मकरंद आबा पाटील , सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू आहे . जिल्ह्यातील जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी आणि विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख बैठकीला उपस्थित आहेत. दरम्यान आज दुपारी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढून शिवसैनिक आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.. 
बुलढाणा
ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या यासह विविध मागण्या घेऊन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जमले होते..
 बुलडाणा
दरम्यान आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. काही शिवसैनिकांनी गेटवर चढून आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला.. दरम्यान पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळाले. अखेर शिवसेनेच्या निवडक शिष्टमंडळाला निवेदन देण्यासाठी आत सोडण्यात आले... यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..