BREAKING तुपकरांची तब्येत अत्यावस्थ; साखरेची पातळी कमालीची घसरली; तुपकरांना हाइपोग्लाइसीमिया? डॉक्टर म्हणाले, कोमात जाऊ शकतात;

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत अन्नत्याग सुरूच ठेवण्याचा तुपकरांचा निर्धार...

 
Tupkar

सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेडराजात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज, ६ सप्टेंबरला तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत अन्नाचा कण देखील घेणार नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. शासकीय पातळीवरून तुपकर यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, स्वतः कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील तुपकर यांच्याशी फोनवरून बोलले मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय माघार नाहीच असा पण तुपकर यांनी घेतला आहे. दरम्यान आत्ता हाती आलेल्या वृत्तानुसार तुपक यांची तब्येत अतिशय खालावली आहे. तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमालीची घसरली आहे.

 थोड्या वेळापूर्वी वैद्यकीय पथकाने तुपकरांची तपासणी केली, त्यावेळी तुपकर यांची तब्येत प्रचंड खालावली असल्याचे दिसून आले. तुपकर यांच्या शरीरातील साखरेची पातळी ५० पर्यंत खाली आली आहे. साखरेची पातळी ५० पर्यंत खाली येणे अतिशय धोक्याचे मानले जाते. यामुळे तुपकर यांना हाइपोग्लाइसीमिया होण्याची भीती आहे. अति अशक्तपणा, चक्कर येणे, घाम फुटणे, डोळ्यासमोर अंधार येणे, थरथरणे , मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याने तुपकर कोमात जाऊ शकतात असे वैद्यकीय तज्ञांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना सांगितले. तुपकर यांना सध्या तातडीच्या उपचाराची गरज आहे.मात्र तुपकर यांनी वैद्यकीय उपचार घ्यायला नकार दिला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत अन्नत्याग सुरूच ठेवण्याचा निर्धार तुपकर यांनी केला आहे.