BREAKING बुलढारणेकरांसाठी अभिमानास्पद बातमी! जिल्ह्याच्या सुपुत्राच्या नेतृत्वाचा डंका राष्ट्रीय पातळीवर; अनिल म्हस्के झाले व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष...

 
 मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): होय.. समस्त बुलढाणा जिल्हा वासीयांसाठी ही बातमी अभिमानास्पद अशीच आहे. पुण्यनगरीचे आवृत्ती संपादक, आतापर्यंत व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अनिल म्हस्के यांची आता व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. आज,१५ मार्चला मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह राष्ट्रीय कोअर कमिटीने अनिल म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

अनिल म्हस्के
पत्रकारितेच्या क्षेत्रात अनिल म्हस्के यांचा आधीपासूनच दबदबा आहे. व्हाईस ऑफ मीडियाच्या स्थापनेनंतर प्रारंभीच अनिल म्हस्के यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. अल्पावधीत संपूर्ण विदर्भात संघटनेचा विस्तार करणाऱ्या अनिल म्हस्के यांच्यावर ३ वर्षांपूर्वी बारामती येथे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
पत्रकार आणि पत्रकारितेसाठी लढणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या संघटन कौशल्याने लिलया पेलणाऱ्या म्हस्के यांनी राज्यात विविध आंदोलनाचे नेतृत्व केले. श्री. म्हस्के यांच्या पुढाकारातूनच पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी समोर आली, या मागणीचा देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याशिवाय राज्यभरात प्रत्येक तालुका आणि जिल्हा केंद्रावर संघटनेचा विस्तार केला. श्री. म्हस्के यांच्या नेतृत्वात व्हाईस ऑफ मीडियाची राज्यपातळीवरील ३ अधिवेशन एक प्रचंड यशस्वी झाली.
गेल्या काही दिवसांपासून व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत नव्याने राष्ट्रीय अध्यक्षाची निवडणूक घेण्याची चर्चा सुरू होती. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कोअर कमिटीत याविषयी अनेक बैठका झाल्या, देशभरातील राज्य अध्यक्षांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर अनिल म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात व्हाईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनिल म्हस्के यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. यावेळी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा. व्हाईस ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, वरिष्ठ पत्रकार चंद्रमोहन पूप्पाला , शेतकरी नेते रविकांत तुपकर, प्रसन्न जोशी, विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.