BREAKING "१ लाखांच्या मोबदल्यात १० लाखांच्या नोटांचे आमिष; चिल्ड्रेन बँकेच्या बनावट नोटांनी फसवणूक करणारी टोळी जेरबंद!

 स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५ हजारांची रोकड, चार मोबाईल, दुचाकीसह ₹२.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त"

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): कमी रकमेच्या मोबदल्यात जास्त रकमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून चिल्ड्रेन बँकेच्या बनावट नोटा, ५ हजारांची रोकड, चार मोबाईल, चाकू आणि दुचाकीसह एकूण ₹२ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील आणखी सहा आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

budhvat

ADVT 

 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटकांकडून "कमी पैसे द्या आणि जास्त रकमेच्या नोटा घ्या" अशा आमिषाने नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या घटना समोर येत होत्या. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

त्या अनुषंगाने २६ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, मलकापूर शहर परिसरात काही जण एका लाख रुपयांच्या मोबदल्यात दहा लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मलकापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कुंड फाट्याजवळ सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत अभिषेक भीमराव इंगळे (वय २०, रा. कुन्हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि मधुर उर्फ सनील खामगोंडे (वय १९, रा. कुन्हा (काकोडा), ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींकडून ५ हजार रुपयांची रोकड, चिल्ड्रेन बँकेच्या १० लाख रुपयांच्या बनावट नोटा, एक चाकू, चार मोबाईल फोन आणि स्प्लेंडर प्लस मोटारसायकल असा एकूण ₹२ लाख ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फिर्यादी सुभाष माणिकराव गावंडे (रा. हिवरखेड, ता. तेल्हारा, जि. अकोला) यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान, या फसवणूक प्रकरणातील पसार असलेल्या आणखी सहा आरोपींचा स्थानिक गुन्हे शाखा आणि मलकापूर शहर पोलीस शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.